आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन- रायसोनींमध्ये अबोला; थंड पाण्याने करावी लागते अंघोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- न्यायालयाच्या परवानगीशिवाय आमदार सुरेश जैन यांना जळगाव कारागृहात हलवण्याची कृती न्यायालयीन पातळीवर टिकते की संबंधित अधिकारी अडचणीत येतात, याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्यावतीनेही 12 नोव्हेंबरला यासंदर्भात न्यायालयात स्वतंत्र अर्ज दाखल केला जाणार आहे.

येत्या 12 नोव्हेंबरला सुरेश जैन यांना जळगावला हलवायचे की नाही, याविषयी जळगाव न्यायालयात निर्णय होणार होता. त्या आधीच त्यांना जळगावला हलविण्यात आल्यामुळे न्यायालयातील निर्णयाचे काय? असा प्रo्न कायदेक्षेत्रात काम करणार्‍यांनाही सतावू लागला आहे.

यासंदर्भात विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांना विचारणा केली असता त्यांनी तुरुंग अधिकार्‍यांनी परस्पर घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे, असे मत व्यक्त केले. यासंदर्भात येत्या 12 नोव्हेंबरला न्यायालयात काय होऊ शकते, या विषयी मात्र अंदाज व्यक्त करायला नकार दिला. त्या दिवशी न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून आपली भूमिका काय असेल हे त्या दिवशीच सर्वांना कळेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जैन यांना जळगावला हलविण्यासंदर्भात झालेल्या न्यायालयीन कार्यवाहीत आपला सहभाग नाही. तरीही आपण स्वतंत्र अर्ज 12 तारखेला न्यायालयात सादर करणार असून जैन यांना जळगावात कोणत्या आणि कोणाच्या अधिकारात आणले गेले याची माहिती मिळावी, अशी विनंती आपण न्यायालयात करणार आहोत, असे नरेंद्र भास्कर पाटील यांनी सांगितले.

जैन-रायसोनींचा अबोला

दरम्यान, कारागृहात एकत्र आलेले जैन-रायसोनी यांनी अबोला पाळला असल्याचे वृत्त आहे. त्या दोघांनी एकदाच औपचारिक आणि अत्यल्प बोलणे केले. त्यानंतर मात्र त्यांनी अबोला पाळला असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगणे टाळले. तरीही अप्रत्यक्षपणे त्यांनी दिलेल्या संकेतातूनही सुरेश जैन-प्रदीप रायसोनी यांच्यातील अबोलाच समोर आला आहे.

थंड पाण्याने अंघोळ

जळगाव कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक ढोले यांच्या कार्यकाळात कारागृहात सौरऊर्जेचे उपकरण बसविण्यात आले होते. मात्र, आता ते बंद आहे. त्यामुळे सर्वच कैद्यांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागते. जैन यांनीही बुधवारी थंड पाण्यानेच अंघोळ केली. त्यानंतर ते दैनंदिन प्रार्थनेतही सहभागी झाले होते. सकाळी उठून ते काही वेळ परिसरात फिरले. कारागृहातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

जळगावात येऊनही जैन एकटेच

जळगावात तब्बल 593 दिवसांनंतर आलेले आमदार सुरेश जैन सध्या तरी एकटेपणाचाच अनुभव घेत असल्याचे चित्र आहे. जळगावात आल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी त्यांना कोणीही भेटायला गेल्याची नोंद नाही. प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांनी भेटू नये, असे आवाहन खान्देश विकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे. त्याचाही तो परिणाम असू शकतो. कारागृहाच्या आत असलेल्या मोकळय़ा जागेत जैन यांनी ‘मॉर्निंग वॉक’ केले. त्यांचे स्वीय सहायक प्रकाश भावसार यांनी त्यांना सकाळचा नाश्ता आणि जेवण आणून दिले, असे तुरुंग प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

औषध प्रशासनाच्या ताब्यात

प्रकृती अद्याप खराबच असल्यामुळे जैन यांनी औषधांचा साठा सोबतच आणला होता. ही औषधे कारागृहाच्या ताब्यात आहेत. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्लय़ाने त्यांना औषधे दिली जाणार आहेत. दरम्यान, जैन यांनी कारागृहातील ग्रंथालयातून काही पुस्तके वाचनासाठी घेतली आहेत. मात्र, कोणतेही वृत्तपत्र त्यांनी वाचनासाठी मागवले नाही, असेही सांगण्यात आले.