आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त विद्यार्थ्यांचा भार महाविद्यालयांवर पडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेच्या मंजुरीपेक्षा २० टक्के जागा वाढवून दिल्या आहेत. मात्र, या अतिरिक्त विद्यार्थ्यांचा आर्थिक भार राज्य शासन उचलणार नाही. तो महाविद्यालयांना उचलायचा आहे. दुसरीकडे गुणवत्ता टिकवली गेली पाहिजे,असे आदेश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. त्यामुळे २०१५-१६ हे शैक्षणिक वर्ष चांगलेच चर्चेत राहणार असून वर्षाच्या शेवटी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार हे निश्चित झाले आहे.
उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून अकृषक विद्यापीठांच्या कुलगुरूंना याबाबत १३ जुलै रोजी पत्र पाठवले आहे. बारावीचा निकाल चांगला लागल्याने एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दोन टप्प्यात विद्यार्थ्यांची क्षमता वाढवून दिली. आता प्रवेश होतील, मात्र त्यांच्या गुणवत्तेचे काय? हा प्रमुख प्रश्न उभा ठाकला आहे. एकीकडे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहत असताना अन्य अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमता सुरुवातीला कमी केली होती. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, असे शासनाचे म्हणणे आहे.
मात्र, दुसरीकडे वाढीव प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचा कोणताही आर्थिक भार शासन उचलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यापीठस्तरावर केलेल्या कार्यवाहीबाबत विभागीय सहसंचालक उच्चशिक्षण संचालक यांच्याकडे अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत. ठराविक महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात, तर काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त जागा रिक्त राहतात. या कारणामुळे शासनाने यंदा नवीन तुकडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता गुणवत्तेवर परिणाम होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

महाविद्यालयांचा ताण वाढला
^प्रवेशक्षमता वाढवली. मात्र, त्यापोटी लागणारा आर्थिक दंड महाविद्यालयाकडून घेतला जात आहे. तुकडी वाढवली नाही. प्राध्यापकांची भरती होत नाही. अशात गुणवत्ता टिकवण्याचेही आव्हान आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे महाविद्यालय प्रशासन अडचणीत सापडले आहे. यंदा शिक्षकांचा ताण वाढणार आहे. डॉ.एल.पी. देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय

गुणवत्ता जपणे महत्त्वाचे
महाविद्यालय,विद्यार्थी संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे प्रवेश क्षमता वाढवून दिली आहे. आता गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, याची जबाबदारी महाविद्यालयांनी घ्यायची आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकावर भर द्यावा लागेल. या संदर्भात राज्य शासनाचीही आग्रही भूमिका आहे. प्रा.डॉ.सुधीर मेश्राम, कुलगुरू, उमवि

स्टाफही तोकडाच
वरिष्ठमहाविद्यालयात प्राध्यापकांची भरती करू नये, असाही शासन निर्णय यापूर्वीच झाला आहे. बारावीचा निकाल चांगला लागला असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. असे असताना शासनाने यंदा तुकड्या वाढवल्या पाहिजे होत्या. प्रवेश वाढल्यानंतर महाविद्यालयात सध्या आहेत त्याच प्राध्यापकांना अतिरिक्त विद्यार्थ्यांनाही शिकवावे लागणार आहे. आर्थिक मदत नाही, प्राध्यापकांची संख्याही वाढवणार नाही. अशा दुहेरी संकटात यंदा महाविद्यालये सापडली आहेत.

वाढीव तुकड्या नाही
राज्यातीलमंजूर प्रवेश क्षमतेच्या जवळपास २५ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन महाविद्यालय (पारंपरिक, व्यावसायिक), विद्याशाखा, विषय, अभ्यासक्रम, वाढीव तुकड्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळणार नाही. वाढीव तुकड्यांनाही नाही तर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बातम्या आणखी आहेत...