आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसुधारगृहातून फरार झालेला संशयित जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2012मध्ये गुन्हा केलेला विधीसंघर्षग्रस्त बालक राकेश उर्फ डुचक्या चंदोरसिंग पावरा (त्या वेळेचे वय 17) याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. 14 ऑगस्ट 2013 रोजी राकेशसह 16 मुलांनी तेथून पलायन केले होते. नंतर पोलिसांनी 6 मुलांचा शोध घेतला होता. त्यानंतर बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुडामोडा (ता.सेंधवा, जि.बडवाणी, मध्य प्रदेश) येथून राकेशला अटक केली आहे.
बालसुधारगृहाच्या खिडकीचे गज कापून या 16 मुलांनी मध्यरात्री पळ काढला होता. त्यातील काही स्थानिक मुलांना पोलिसांनी पकडले. मात्र, राकेशसह आणखी 10 जण पोलिसांच्या हाती लागले नव्हते. परप्रांतातील असल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण झाले होते. अशातच मध्य प्रदेशात एका गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने सापळा रचून राकेशला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अमळनेरमधून लागली लिंक
अमळनेर शहरात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा खून झाला होता. या खुनाचा तपास करण्यासाठी एलसीबीचे पथक अमळनेरात दाखल झाले. राकेश हाही मध्य प्रदेशातील 15-20 लोकांसह अमळनेर येथे एका खासगी कंपनीत कामासाठी आला होता. संबंधित कंपनीच्या मालकाकडून या सर्व लोकांनी पगाराची रक्कम आगाऊ घेऊन धूम ठोकली होती. पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून ही माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्य प्रदेश गाठून बुधवारी राकेशला अटक केली.
पथकाने लावला सापळा
सेंधवा तालुक्यातील जुडामोडा हे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. 50-60 झोपड्यांची वस्ती असलेल्या या गावात जवळपास पावरा समाजाचीच घरे आहेत. तेथे पोहोचल्यानंतर राकेशला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकाला बराच वेळ वाट पाहावी लागली. या परिसरातून संशयितांना सुगावा लागल्यास पळ काढण्यासाठी जंगल व टेकड्यांचा सहारा आहे, हे ओळखून पथकातील एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक जी.व्ही.निकम, अशोक पवार, उत्तमसिंग पाटील, बापुराव भोसले, दिलीप येवले, ईश्वर सोनवणे यांनी सापळा रचून राकेशला ताब्यात घेतले.