आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूचा दुचाकीमुळे उलगडा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महिनाभरापूर्वीच बर्‍हाणपूरला कारागीर शोधण्यास मोटारसायकलने निघालेल्या प्रकाश चौधरी यांचा अपघात झाला होता. यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांना जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले होते. दुसर्‍या दिवशी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताजवळ कुठलीही कागदपत्रे नसल्याने अनोळखी म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. दुसरीकडे प्रकाश आढळत नसल्याने नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिसात त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद केली होती, त्याच्या तपासाबाबत विचारणा करण्यासाठी मंगळवारी पोलिस ठाण्यात गेलेल्या नातेवाईकांना प्रकाशची मोटारसायकल तेथे आढळून आली. आश्चर्य म्हणजे पोलिसांनाही त्याबाबत काहीच माहीत नव्हते. त्यानंतर नव्याने शोध घेतला असता बुधवारी प्रकाशचा महिनाभरापूर्वीच मृत्यू झाल्याचे उघड झाले. दरम्यान त्यांचा अपघात झाला की, घातपात याबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह कायम आहे.
अशी घडली घटना
रामेश्वर कॉलनी येथील प्रकाश यादवराव चौधरी (वय 42) यांचा कचोरी-समोसे विक्रीचा व्यवसाय असल्याने 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ते दुकानासाठी कारागीर शोधण्याला बुरहाणपूर येथे दुचाकीने (एमएच 19 बीएस 7127) निघाले होते. तीन-चार दिवस उलटूनही ते न परतल्याने त्यांचा ठाव ठिकाणा न लागल्याने अखेर नातलगांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यास ते बेपत्ता झाल्याची नोंद केली होती तर दुसरीकडे 5 फेब्रुवारी रोजी प्रकाश चौधरी यांना दुपारी 1.55 वाजता एका अनोळखी व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. एमएलसीवर (क्रमांक 1753) अनोळखी व्यक्ती असे नोंदविण्यात आले. डॉ.पाटील यांनी चौधरींवर उपचार केले. मात्र चौधरी यांना रुग्णालयात आणणारी व्यक्ती कोण? हे कुणालाच माहीत नाही. उपचार सुरू असतानाच 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता चौधरी यांचा मृत्यू झाला. अनोळखी असल्यामुळे शवविच्छेदन करून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तशी नोंदही शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. रुग्णालयाने मृतदेहाचे छायाचित्र काढून शहर पोलिस ठाण्यात पाठवले होते. महिना उलटला तरी प्रकाश चौधरी यांचा तपास न लागल्याने नातलग मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना त्यांची मोटारसायकल तेथे आढळून आली. त्यांनी त्याविषयी पोलिसांना विचारणा केली असता पोलिसही निरुत्तर झाले. त्यांनी पुन्हा चौधरी यांचा शोध घेतला असता वरील घटनाक्रम उघड झाला. सिनेकथानकाप्रमाणे घडलेल्या या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडले.
दरम्यान, कुटुंबीयांना चौधरी यांचा मृतदेहसुद्धा पहायला मिळाला नाही. घरातून निघताना चौधरी यांच्या खिशात 20 हजार रुपये असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा नेमका अपघात झाला होता की कोणी पैशासाठी किंवा अन्य कारणासाठी त्यांचा घातपात केला याबाबत प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करणारा व्यक्ती कोण? तसेच मोटारसायकल पोलिस ठाण्यात आणून गुपचुपपणे लावून ठेवणारा कोण? यांचा तपास घेण्याची गरज आहे.