आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात सुवर्णप्राशसाठी फसवणूक; घरोघरी जाऊन लुबाडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या सुवर्णप्राश विधीसाठी पालकांच्या घरी जाऊन लुबाडले जात असल्याचा प्रकार शिवाजीनगरमध्ये शुक्रवारी उघड झाला. घरी येऊन नावनोंदणी केलेल्या कार्डवर असलेल्या पत्त्यावरील डॉक्टरांना मात्र याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मुलांना तेथे घेऊन गेलेल्या पालकांची पायपीट तर झालीच शिवाय मनस्तापही सहन करावा लागला.

दालफड भागात के.एम.हेल्थकेअर असोसिएशन संस्थेतर्फे घरोघरी जाऊन 3 महिने ते 15 वर्षांच्या मुलांना सुवर्णप्राश डोस देण्यासाठी नावनोंदणी करून 10 रुपये फी आकारली. त्या बदल्यात दिलेल्या कार्डवर शिवाजीनगराच्या डॉ. शेखर पाटील यांच्या रुग्णालयाचा पत्ता दिला होता. 29 ऑगस्ट, सायंकाळी 5 ते 7 ही वेळ शिबिरासाठी होती. पालक गुरुवारी मुलांना घेऊन सुवर्णप्राश डोससाठी डॉक्टरांकडे पोहचले. तेथे डॉ.शेखर पाटलांना या शिबिराची माहिती नव्हती. तेव्हा या बनवेगिरीचा भंडाफोड झाला.

आरोग्य अधिकार्‍यांनी झटकले हात
संस्थेकडून घरोघरी जाऊन औषधे विक्री करण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक आहे. के.एम. हेल्थकेअर असोसिएशनने मनपाची परवानगी घेतली नाही. याबाबत आरोग्य अधिकारी विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत हात झटकले. प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलाणी यांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले.


माझ्या रुग्णालयाचा पत्ता त्या कार्डवर देण्यात आलेला आहे, मात्र, शिबिर आयोजित केल्याबाबत माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही.
- डॉ.शेखर पाटील


आमच्या भागातील अनेक पालकांनी नावनोंदणी करून कार्ड घेतले. ज्या डॉक्टरांचा पत्ता दिला होता तेथे कुणीच आले नाही. त्यांच्याशी संपर्कही झाला नाही.
- ज्योती तिवारी

सुवर्णप्राशन विधीसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ नये यासाठी आयुर्वेदतज्ज्ञांकडूनच तो करवून घेतला पाहिजे. काही वेळा त्यातील घटक चुकल्यास आरोग्यावर बेतू शकते.
-डॉ.मिलिंद मोरे, आयुर्वेदतज्ज्ञ.