आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू फैलाव रोखण्यासाठी सर्दी, तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील मेथाजी मळा भागातील महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होताच अलर्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेने या परिसरातील ७० घरांचे सर्वेक्षण केले. सुदैवाने या भागात सर्दी आणि तापाचे रुग्ण आढळले नसले तरी मृत महिलेचे नातलग अाणि संपर्कात आलेल्या व्यक्तींना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात येणार आहेत.
मेथाजी मळा भागातील रहिवासी प्रतिभा विलास निकम (३५ वर्षे) या महिलेचा शनिवारी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. या आजाराची लक्षणे जाणवल्याने पंधरा बंगला भागातील अन्य एका महिलेवर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांची ये-जा असलेल्या भुसावळात स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग आणि मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवार आणि मंगळवारी मेथाजी मळा, पंधरा बंगला आदी भागातील ७० घरांचे सर्वेक्षण केले.
याठिकाणी सर्दी, ताप किंवा स्वाइन फ्लूची लक्षणे असलेला एकही रुग्ण आढळला नाही. तरीही खबरदारीचे उपाय म्हणून मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या नातलगांची तपासणी करून त्यांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी "दिव्य मराठी'ला दिली.
रेल्वेमुळे धोका जास्त

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरात स्वाइन फ्लूच्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. भुसावळ शहर रेल्वेचे जंक्शन असल्याने दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात.त्यामुळे इतर कोणत्याही शहरांपेक्षा भुसावळमध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. मात्र, शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने लवकरच दिलासा मिळू शकतो.
- संभाव्य उपाययोजनाम्हणून टॅमी फ्लूच्या ५०० गोळ्या मागवल्या आहेत. मृत महिलेच्या नातेवाइकांवर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनानुसार उपचार होतील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. डॉ.कीर्तीफलटणकर, महिला वैद्यकीय अधिकारी, पालिका रुग्णालय, भुसावळ
असा होतो संसर्ग
स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या सहा फुटाच्या कक्षेत एखादी व्यक्ती आल्यास त्याला लागण होण्याचा धोका असतो. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती जास्त असेल तर शरीर एचवनएनवन विषाणूंचा प्रतिकार करते. यामुळे खूप घाबरून जाण्याचे कारण नाही. काळजीपूर्वक घेतलेली दक्षता या आजाराला दूर ठेवते.
ओळखा फरक

फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ अगोदर दिसतात. फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणा जाणवतो. नाक सतत बंद अथवा वाहत असेल किंवा डोकेदुखी आणि घसा दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे पुढील धोका टाळता येऊ शकतो.
ही आहेत लक्षणे

स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्वसाधारण फ्लू सारखी असतात. यात थंडी, ताप, १०० डिग्रीपेक्षा जास्त ताप, सर्दी-खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी आदींसारखी लक्षणे दिसून येतात. कधीतरी सातत्याने उलटी आणि जुलाब होतात. ही लक्षणे जाणवताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत.
- डोळे, नाक, तोंडांना सतत हात लावू नये. ठराविक वेळेनंतर हात धुवावेत
- लक्षणे दिसू लागल्यास सात दिवस किंवा पूर्ण बरे होईपर्यंत घरातच थांबणे योग्य
- खोकला, शिंख आल्यास नाका-तोंडावर हातरुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा
- वापरलेला टिश्यू पेपर, हातरुमाल इतर कोणासह वापरण्यासाठी देऊ नये

घाबरू नका; असा करा स्वत:चा बचाव

- पालिकेच्या आरोग्यविभागात आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. शहर स्वच्छतेच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. स्वाइन फ्लूचा फैलाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. अख्तरपिंजारी, नगराध्यक्ष, भुसावळ