आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! मिठाईवर चांदीऐवजी अँल्युमिनियमचा वर्ख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मिठाई आकर्षक दिसावी म्हणून चांदीचे वर्ख लावले जाते. मात्र, काही विक्रेते चांदीऐवजी अँल्युमिनियमचे वर्ख लावतात. या मुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. अँल्युमिनियमचे शरीरावर घातक परिणाम शक्य असल्याने ग्राहकांनी खातरजमा झाल्यावरच मिठाई खरेदी करावी. दुसरीकडे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र साधी तपासणीदेखील होत नसल्याचे वास्तव आहे.

ग्राहकांच्या पसंतीसाठी मिठाईवर चांदीचा वर्ख लावला जातो. या मुळे मिठाई आकर्षक होते. मात्र, हा वर्ख किती घातक आहे? याची ग्राहकांना फारशी जाणीव नसते. कारण चांदीच्या नावाखाली अँल्युमिनियमचा वर्खही वापरला जाऊ शकतो. विशेष म्हणजे मिठाईवरील वर्ख चांदीचा की, अँल्युमिनियमचा? हे कोणत्याही प्रकारे ओळखता येत नाही. चांदीची किंमत दिवसेंदिवस महाग होत आहे. परिणामी कमी खर्चात जास्त नफा कमवण्यासाठी मिठाई विक्रेते किंवा त्यांना हा वर्ख पुरवणारे खरोखरच चांदीचा वर्ख वापरतात की, अँल्युमिनियमचा? याबाबत संशय कायम आहे. मात्र, चांदीऐवजी अँल्युमिनियमचा वापर केलेली मिठाई खाण्यात आल्यास त्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत. अशा भेसळयुक्त वर्खमुळे अँसिडिटी, जळजळ आणि पोटाचे विकार होतात. मात्र, धकाधकीच्या जीवनात हा प्रकार अनेकांच्या लक्षातही येत नाही. दुर्दैवाने शहरातील हॉटेल्स् वा अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांची नियमित तपासणी होत नसल्याने मिठाईवरील वर्ख तपासणी पालिकेच्या आरोग्य विभागासाठी दूरचा विषय ठरला आहे.

नियमित तपासणी करणार
सणासुदीत नियमित तपासणीवर भर आहे. गेल्या वर्षी धुळे येथे चांदीऐवजी अँल्युमिनियमचा वर्ख आढळला होता. शहरातून 15 नमुने घेतले आहेत. -बी.यू.पाटील, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

अशी आहे किंमत
चांदीचा वर्ख असलेल्या 150 पाकिटांची किंमत 6 हजार 500 रुपये आहे. यात 3 बाय 3 इंच आणि 6 बाय 6 इंच या दोन आकारात वर्खचे तुकडे उपलब्ध होतात. पाच ते सहा रुपयांना लहान आकाराचा वर्ख मिळतो. मात्र, चांदी महाग होत असल्याने वर्खदेखील महागला आहे.

असा ओळखा फरक
मिठाईवरील अस्सल चांदीचा वर्ख बोटावर चोळला तर तत्काळ एकजीव होतो. जिभेवर ठेवला तर क्षणात विरघळतो अँल्युमिनियमचा वर्ख बोटांनी चोळण्याचा प्रयत्न केल्यास तो पेपरसारखा जाणवतो. मिठाईबरोबर तोंडात गेल्यास विरघळण्यासाठी बराच वेळ लागतो.