आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात स्वाइन फ्लूने काढले पुन्हा डोके वर; नागरिक भयभीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन महिला आणि 17 वर्षीय युवक बाधित आहे. त्यापैकी एका महिलेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका अकरा महिन्याच्या बालकालादेखील स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या बालकावर देवपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौघा रुग्णांची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी आणखी दोन संशयित महिला दाखल झाल्या आहेत. तपासणीनंतरच त्यांना स्वाइन फ्लू आहे की नाही, हे समजणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेतली जात आहे.

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात 8 एप्रिलपासून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात वीस बेडची व्यवस्था आहे. या विभागात एक डॉक्टर, दोन परिचारिकांसह इतर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय महापालिका प्रशासनाचीदेखील मदत घेतली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहर परिसरातील सुमारे 200 रुग्णालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. स्वाइन फ्लू बाधित रुग्ण आढळल्यानंतर लागलीच महापालिकेला माहिती द्या, अशी सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे. बाधित रुग्णाचे कुटुंबीय व नातलगांचीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या लाळ व थुंकीचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाला जिल्हा रुग्णालयातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. शहरात स्वाइन फ्लूची साथ पसरू नये, यासाठी साथरोग अधिकारी डॉ. आर. डी. पाटील हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी दिली.

गतवर्षी चौघांचा झाला होता मृत्यू
प्रशासनाच्या माहितीनुसार गेल्या वर्षी स्वाइन फ्लूमुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. पुरेशी काळजी न घेतल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचा दावा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. त्याचबरोबर चालू वर्षी अंजना शिंदे व मालेगावच्या एका तरुणाचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. त्यामुळे सतर्कता पाळली जात आहे
होम व्हिजिट त्याच दिवशी
स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे लक्षात येताच संबंधित रुग्णाच्या घरी त्याच दिवशी होम व्हिजिट दिली जाते. संबंधित रुग्णाचे कुटुंबीय, संपर्कात आलेले नातलग यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांनाही त्याच दिवसापासून ती औषधे दिली जातात.
चौघांवर उपचार
सध्या मालेगाव येथील अर्शद अली (17), मौलवीगंज परिसरातील तस्नीमबी रशीद अहमद (40) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात तर फिरदोसनगरातील नसीमबानो, चाळीसगाव येथील रूपेश सूर्यवंशी (वय अकरा महिने) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘टॅमी फ्लू’ची सतराशे पाकिटे
स्वाइन फ्लूच्या टॅमी फ्लू गोळयांचा साठा जिल्हा रुग्णालय व मनपा आरोग्य विभागातर्फे झाला आहे. जिल्हा रुग्णालयाकडे दीड हजार तर महापालिका प्रशासनाकडे 200 टॅमी फ्लूचे पाकिटे आहेत.
ही आहेत लक्षणे...
* तीव्र स्वरूपाचा ताप
* श्वास घेताना त्रास
* जास्त प्रमाणात खोकला
* नाक व डोळयातून पाणी येणे
* घशात दुखणे

पूर्वकाळजी महत्त्वाची..
* गर्दीत जाणे टाळावे,
* रुमाल, मास्क लावा
* शिंकताना नाका-तोंडापुढे रुमाल घ्या
* लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जावे
* वेळेवर औषधी घ्या