आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूळेकरांना स्वाइन फ्लूचे गांभीर्य नाही, एकमेकांच्या मदतीला नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजाराबाबत शहरातील आरोग्याच्या चारही यंत्रणा उदासीन असल्याचे चित्र पुढे आले आहे. चारही यंत्रणांमध्ये कुठलाही समन्वय नाही. त्यामुळे या चारही यंत्रणांनी रुग्णांसाठी स्वतंत्र कलेक्शन सेंटर तयार केले आहे.
आपापल्या बळावर रुग्णांचे रिपोर्ट पाठवायचे ते मिळवायचे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड व्हायला लागली आहे. महापालिका हाताळत असलेल्या रुग्णांबाबत जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज कुठलीही जोखीम घ्यायला तयार नाही. तर या यंत्रणांच्या रुग्णांबाबतही असाच प्रकार होत आहे.
शहरातील जिल्हा रुग्णालयात गत आठवड्यात मालेगाव तालुक्यातील एका महिलेचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र, एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसत आहे. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याबरोबरच स्क्रिनिंग करून रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आजाराचे गांभीर्य पाहून टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा साठाही मागविण्यात आलेला आहे. जिल्हा रुग्णालयात टॅमी फ्लू गोळ्यांसह व्हॅक्सिन मागविण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेत हालचाली दिसत नाही. सध्या महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालये, ग्रामीण तालुका रुग्णालय, ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये स्क्रिनिंग सेंटर सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयातही स्वतंत्र स्वाइन फ्लू कक्ष सुरू झालेला आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे रक्तनमुने तसेच स्वॅपचे नमुने घेण्यात अडचणी येत आहेत.

असा होतो संसर्ग

स्वाइनफ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या सहा फुटाच्या कक्षेत एखादा व्यक्ती आल्यास त्याला लागण होण्याचा धोका असते. मात्र,रोगप्रतिकार शक्ती जास्त असेल तर शरीर एचवन,एनवन विषाणूंचा प्रतिकार करते. यामुळे खूप घाबरून जाण्याचे कारण नाही. काळजीपूर्वक घेतलेली दक्षता या आजाराला दूर ठेवते.

येथे कलेक्शन सेंटर

जिल्ह्यातप्राथमिक आरोग्य केंद्रांसह महापालिका हद्दीत स्वॅप कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात सहा कलेक्शन सेंटर आहेत. प्रत्येक यंत्रणेकडून आपल्या स्तरावर स्वॅप घेऊन ते पुणे येथील लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत.

ही आहेत लक्षणे

स्वाइनफ्लूची लक्षणे ही सर्वसाधारण फ्लूसारखी असतात. यात थंडी, ताप १०० डिग्रीपेक्षा जास्त, सर्दी-खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी आदींसारखी लक्षणे दिसून येतात. कधीतरी सातत्याने उलटी आणि जुलाब होतात. ही लक्षणे जाणवताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत.

असा आहे टॅमी फ्लूचा साठा

जिल्ह्यातसध्या जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे टॅमी फ्लूच्या एक हजार ६२० एवढ्या गोळ्या आहेत. त्यात ३० एमजी ४५ एमजीच्या प्रत्येकी ४००, ७५ एमजीच्या ८२० गोळ्यांचा साठा आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारित दोन हजार ८०० गोळ्या तसेच ५० सिरप आहेत. त्यात ३० ७५ एमजीच्या प्रत्येकी एक हजार ४५ एमजीच्या ८०० गोळ्या आहेत. तसेच महापालिका प्रशासनाकडे एक हजार गोळ्यांचा साठा उपलब्ध झालेला आहे. रुग्णांची तपासणी केल्याशिवाय मात्र या गोळया घेता येणार नाहीत.

मास्कचा तुटवडा

स्वाइनफ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण तसेच संसर्ग होऊ नये यासाठी डॉक्टरांना विशेष मास्क आवश्यक आहेत. मात्र, अद्याप जिल्ह्यात असे मास्क उपलब्ध झालेले नाहीत. परिणामी आरोग्य यंत्रणने अंतर्गत कार्यरत अिधकारी कर्मचाऱ्यांनाही पारंपरिक मास्क लावून काम करावे लागत आहेत.

घाबरू नका; असा करा बचाव

- खोकला, शिंक आल्यास नाका-तोंडावर हातरुमाल अथवा टिश्यूपेपर ठेवावा.
- एकदा वापरलेला टिश्यूपेपर, हातरुमाल इतर कोणासही वापरण्यासाठी देऊ नये.
- डोळे, नाक, तोंडाला सतत हात लावू नये. ठरावीक वेळेनंतर हात धुवावेत.
- लक्षणे दिसू लागल्यास सात दिवस किंवा पूर्ण बरे होईपर्यंत घरातच थांबणे योग्य.

^वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वापचार रुग्णालयासह जिल्हा परिषद, महापालिका हद्दीत उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्याही उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्वॅप कलेक्शन सुरू करण्यात आलेले आहेत. डॉ.अनंत बोर्डे, अधीक्षक, हिरे वैद्यकीय महाविद्यालय