आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उष्ण तापमानातही विषाणू सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - थंड तापमानातच जिवंत राहणार्‍या ‘स्वाइन फ्लू’चे विषाणू सक्षम होत असून 37 अंशांपेक्षा अधिक तापमानातही ते तग धरून असल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. याचा फैलाव रोखण्यासाठी सर्वेक्षण व अन्य उपाययोजना करण्याचा निर्णय झाला असून यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाची काळजी वाढली आहे. शासकीय सुटी असताना शुक्रवारी छत्रपती शाहू रुग्णालयात डॉक्टर, तसेच सर्वेक्षण कर्मचार्‍यांची बैठक घेण्यात आली. बैठकीस उपायुक्त भालचंद्र बेहरे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला शर्मा, डॉ. नीता देशमुख व महापालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील रुग्णस्थिती व सर्वेक्षणासंदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला. तीन दिवसांत महापालिकेच्या सर्वेक्षण अधिकार्‍यांनी 1 हजार 796 घरांमधील नागरिकांची तपासणी केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द केल्याचेही डॉ. शर्मा यांनी या वेळी सांगितले.

दोन रुग्णालयांत तपासणी
महापालिकेच्या छत्रपती शाहू रुग्णालय आणि शिवाजीनगरातील डी.बी.जैन रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची तपासणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. शहरातील अतिदक्षता कक्ष असलेल्या रुग्णालयांमधील संशयित रुग्णांची दैनंदिन माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. न्यूमोनिया असलेल्या सर्व रुग्णांबाबत बारकाईने निरीक्षण नोंदवावे, असे सांगण्यात आले.

महापालिकेकडे पुरेसा औषधसाठा
महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधांचा सध्या पुरेसा साठा आहे. 75 मिलीग्रॅम पॉवरच्या 300, 85 मिली ग्रॅमच्या 100 गोळ्या, 30 मिलीग्रॅम क्षमतेच्या 500 गोळ्या आहेत. ‘एन-95’चे 75 मास्क व 800 डिस्पोजल मास्क आहेत.

समन्वयाअभावी प्रशासन यंत्रणेच्या हालचाली थंड
स्वाइन फ्लूचे तीन नमुने पॉझिटिव्ह येऊनही शासकीय यंत्रणा जागची हलली नाही. जिल्हाधिकार्‍यांना मात्र दोनच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक एस.एन. लाळीकर यांनी सांगितले. सिव्हिल सर्जन आणि जिल्हाधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शुक्रवारी काहीच हालचाली झाल्या नाहीत. एकीकडे लाळीकर यांची उदासीनता तर दुसरीकडे जिल्हाधिकारी गंभीर नसल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण गुरुवारी पॉझिटिव्ह आले. ही माहिती डॉ. लाळीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांसह सर्वांपासून लपवून ठेवली. जिल्हाधिकार्‍यांनी विचारणा केल्यानंतर त्यांना दोनच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. नमुने पॉझिटिव्ह असल्याने यंत्रणा स्तरावर तातडीने उपाययोजना झाल्या नाहीत. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी शुक्रवारी तातडीने बैठक आयोजित केली होती. ही बैठकदेखील झाली नाही. स्वाइन फ्लूबाबत यंत्रणेचे अधिकारी एकत्र आलेच नाहीत. दोन जबाबदार अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि महापालिका क्षेत्र असल्याने हद्दीच्या वादात महापालिकेवर जबाबदारी झटकून जिल्हा प्रशासनाने कातडी बचाव धोरण अवलंबले आहे.

सिव्हिलमध्ये मागवला पोलिस बंदोबस्त
स्वाइन फ्लूचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कलाबाई ठाकरे व दिनेश गोयर यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णाचे नातेवाइक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असता स्थापन केलेल्या कक्षात व्हेंटिलेटरची कोणतीही व्यवस्था नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. डॉ. एस.एन.लाळीकर यांना चर्चेसाठी बोलावले असता त्यांनी पोलिस बंदोबस्त मागवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. रुग्णांना देण्यात येणार्‍या गोळ्या 75 एमजी च्या अपेक्षित सिव्हिलमध्ये केवळ 45 एमजीच्या गोळ्या उपलब्ध आहेत.त्यामुळे डोस पूर्ण करणे अशक्य असल्याचे रुग्णाचे नातेवाइक विवेक ठाकरे यांनी सांगितले. 13 जणांनी टॅमी फ्लूच्या गोळ्या घेतलेल्या असताना तिघांव्यतिरिक्त अन्य दहा जण कोठे आहेत याचा साधा तपासही केला नसल्याने सिव्हिलच्या कारभारावर शंका उपस्थित करण्यात आली. स्वाइन फ्लू कक्षात व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. मात्र सर्व व्हेंटिलेटर रुग्णांना लावण्यात आल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, शहर जिल्हाध्यक्ष अँड. सलीम पटेल यांच्यासह कार्यकर्ते व रुग्णांचे नातेवाइक उपस्थित होते.

कक्ष तिसर्‍या मजल्यावर
जिल्हा रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या 13 नंबरच्या कक्षातील पुरुष मनोरुग्ण हॉलमध्ये सायंकाळी स्वाइन फ्लू कक्ष स्थापन करण्यात आला. त्यात चार खाटा असून दुपारी आदेश आल्यानंतर सायंकाळी कक्ष सुरू करण्यात आला. सायंकाळपर्यंत एकही रुग्ण दाखल नसल्याची माहिती स्थानिक कर्मचार्‍यांनी दिली. गेल्या वर्षी हा कक्ष तळ मजल्यावर होता. यामुळे रुग्णांना सहज कक्ष सापडत होता. परंतु आता तिसर्‍या मजल्यावर कक्ष स्थापन करण्यात आल्याने रुग्णांना त्याचा शोध घ्यावा लागेल असेही रुग्णालयातील जाणकारांनी सांगितले.