आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Switch Off Engine When Vehicles Stop At Signal For More Than One Minut

AWARENESS: सिग्नलवर जाते 391 डॉलर्सचे इंधन वाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील प्रमुख 20 ट्रॅफिक सिग्नलवर सिग्नल बंद असताना दिवसातून वर्दळीच्या सात तासांत वेगवेगळ्या प्रकारची 784 वाहने एका मिनिटासाठी उभी राहतात. या एका मिनिटात वाहने ही सुरूच असतात, त्यामुळे प्रत्येक वाहनाचे इंधन जळत असते. थांबलेल्या अवस्थेत वाहने बंद केली तर 190 लिटर पेट्रोल तर 136 लिटर डिझेलची बचत होऊ शकते.

शहराच्या वाढत्या विकासासोबतच वाहतूकही वाढली आहे. दिवसातून सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत प्रत्येक चौकात वर्दळ असते. या सात तासांत एक सिग्नलवर 105 मिनिटे सिग्नल बंद असतो. म्हणजेच या 105 मिनिटांसाठी वाहनांना थांबावे लागते. मात्र, या वेळी वाहनधारक वाहने बंद करत नाहीत. परिणामी मोठय़ा प्रमाणावर इंधन वाया जाते. ‘दिव्य मराठी’ने शहरातील रिक्षा, चारचाकी, दुचाकी आणि बसेस यांची संख्या व त्यांच्या चौकातील होणार्‍या फेर्‍यांवरून इंधन नासाडीचा सारांश काढला आहे.

टायमर नसल्यामुळे अडचण
शहरात असलेल्या प्रमुख 20 सिग्नलपैकी केवळ टॉवर चौकातील सिग्नलवरच टायमर बसवले आहे. टायमरमुळे वाहनधारकांना थांबण्याची निश्चित वेळ माहीत असते. त्यामुळे या चौकात बहुतेक वाहनधारक वाहने बंद करतात. मात्र, उर्वरित 19 सिग्नलवर टायमर नसल्यामुळे वाहनधारक वाहने बंद करीत नसल्यामुळे इंधनाची नासाडी होते. पालिकेने प्रत्येक सिग्नलवर टायमर बसवल्यास मोठा फरक पडू शकतो.