आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना टॅब !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील अाेझे कमी करण्याची नुसतीच चर्चा सुरू असताना जळगाव तालुक्यातील शाळेने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली अाहे. सर्व विद्यार्थ्यांना हायटेक करणारी ही शाळा खासगी किंवा अांतरराष्ट्रीय नाही; तर जिल्हा परिषदेची शाळा अाहे. गावकऱ्यांच्या पुढाकाराने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अाठवडाभरात टॅब देऊन त्यांच्या दप्तराच्या अाेझ्यापासून मुक्तता केली जाणार अाहे.

जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग अाहेत. दोन शिक्षक असणाऱ्या या शाळेत ५६ विद्यार्थी शिकतात. शाळेला जानेवारी २०१५ राजी आयएसओ नामांकनही प्राप्त झाले आहे. अाता शाळेने पुढचे पाऊल उचलत मुलांना अभ्यासक्रमाचा समावेश असलेला टॅब देण्याचा निर्णय घेतला अाहे. गावकऱ्यांच्या मदतीने व लोकसहभागातून शाळेने तब्बल ५६ टॅब खरेदी केले आहेत. त्यापैकी ३० टॅब प्रत्यक्ष उपलब्धही झाले आहेत. आठ दिवसांत उर्वरित २४ टॅब मिळणार आहेत.

तरुणांची मदत महत्त्वाची
गावातील उच्चशिक्षित युवक, युवतींची शाळेला मदत करतात. मुलांनी टॅब खरेदीसाठी आर्थिक मदत दिली. पण साेबत दररोज एक तास शाळेत येऊन मुलांना शिकवण्याचेही काम करतात. शिक्षकांसह युवक, युवतींच्या प्रयत्नांमुळे शाळेतील प्रत्येक मुलगा आता इंग्रजी वाचू शकतो. उत्तम प्रकारे अभ्यास करू शकतात.

दप्तरही केले बंद
अरुण चौधरी व प्रवीण चौधरी या दोघाही शिक्षकांनी यावर्षी शाळा सुरू होताच गेल्या वर्षाची मुलांची पुस्तके जमा करून घेतली. ती पुस्तके त्या वर्गात नव्याने अालेल्या मुलांना दिली. तसेच त्या वर्गासाठी शासनाकडूनही नवीन पुस्तके मिळाली. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे दोन संच झालेत. आता मुले एक संच घरी तर दुसरा शाळेत ठेवतात. परिणामी, त्यांना दररोज दप्तर आणण्याचीही गरज भासत नाही.
उपक्रम यशस्वी झाला आहे
सर्व गावकरी व शिक्षकांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी झाला आहे. येणाऱ्या काळात शाळेत अजून चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एम.के.पाटील, सरपंच, सावखेडा खुर्द, ता. जळगाव
असे झाले प्रयत्न
शाळेला आयएसओ मिळाल्यावर मुलांना टॅब देण्याचा विचार सुरू झाला. सरपंच एम.के.पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अरुण चौधरी व शिक्षक प्रवीण चौधरी यांनी चाचपणी केली. कष्टकरी मुलांच्या एका ग्रुपने तीन टॅब देण्याचे जाहीर केले. पाहता पाहता सारा गाव झपाटून उपक्रमात सहभागी झाला. या उपक्रमात सावखेडा गावातील प्रत्येक माणसाने सहभाग घेतला.