आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे - जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात नुकतीच शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सापडलेल्या बोगस डॉक्टरांचा आकडा मोठा आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर शोधमोहिमेसंदर्भात समितीची बैठक डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, डॉ. रवी वानखेडकर, डॉ. वाडेकर, डॉ. आर. बी. पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक डी. आर. सपकाळ, पंजाबराव साळुंखे, गायत्री सोशल अँण्ड वेल्फेअर संघटनेचे अँड. चंद्रकांत येशीराव आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. करंजकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टर अधिक आहेत. त्यामुळे त्यांचा केवळ शोध घेऊन चालणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस व आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे कार्य हाती घेण्याबाबत त्यांनी सूचना केली. या वेळी अँड. चंद्रकांत येशीराव यांनी डॉक्टरांकडून खोट्या भूलथापा देणार्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतात. त्यासंदर्भात प्रश्नन उपस्थित केला. रुग्णांची फसवणूक करण्यासाठी बनावट जाहिराती देणार्या डॉक्टरांवरदेखील कारवाई करण्याचे त्यांनी सूचित केले. त्याला अनुमोदन देत डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले की, जाहिराती देणार्या बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी स्टिंग ऑपरेशन करून कारवाई करण्याची सूचना या वेळी केली. याप्रसंगी डॉ. मोरे यांनी बोगस डॉक्टरांविषयी प्रशासनाला आकडेवारीनुसार योग्य माहिती दिली.
हरवली होती फाइल
बोगस डॉक्टरांच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत विशेष शोधपथक नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर गोपनीय माहितीची फाइल तयार करण्यात आली आहे. ही फाइल जिल्हा परिषदेतून गहाळ झाली होती. त्यासंदर्भात उलटसुलट चर्चा होत आहे. त्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
हे आहेत बोगस डॉक्टर
ज्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्यानुसार नोंदणी करण्यात आलेली नाही. तसेच ज्यांना केंद्र व राज्य शासनाची मान्यता नाही, असे डॉक्टर बोगस ठरवण्यात आले आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारचे हजारो डॉक्टर सध्याच्या घडीला जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.