आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठी नेमाने निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अवैध वाळू वाहतूकप्रकरणी नदीपात्रात अडकलेल्या डंपरमध्ये भागीदारी असलेल्या तलाठी सत्यजित नेमाने यांना प्रांताधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. याप्रकरणी तहसीलदार कैलास देवरे यांनी केलेल्या चौकशीत नेमानेंची त्यात भागीदारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पिंप्राळ्याच्या मंडळाधिकार्‍यांच्या बदलीची शिफारस जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. तसेच वाळूचोरी रोखण्यात मोठा अडसर असलेल्या प्रशासनातील ‘वाळूचोरां’विरुद्ध कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.

निमखेडी शिवारात तहसीलदार कैलास देवरे यांच्या पथकाने पकडलेल्या स्वप्निल नेमाडे यांच्या मालकीच्या डंपरमध्ये तलाठी सत्यजित नेमाने यांची भागीदारी होती. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी व तहसीलदारांनी चौकशी केली. कागदोपत्री पुरावा मिळवण्यात अडचण येत असल्याने तहसीलदारांनी गुप्त यंत्रणेमार्फत नेमाने यांची चौकशी केली. त्यात नेमाने यांची भागीदारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नेमानेंची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, यातून महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यात अडथळा येऊ नये म्हणून नेमाने यांना निलंबित करण्यात आले आहे.

बोगस नोंदी केल्याचा आरोप
जमिनीच्या नोंदीसंदर्भात मंडळाधिकार्‍यांच्या मंजुरीविना थेट एनएची नोंद करून सातबारा उतारा दिल्याची तक्रार तलाठी नेमाने यांच्याविरुद्ध प्राप्त झाली आहे. त्यामुळे या बोगस सातबार्‍याचे प्रकरण नेमाने यांच्या अंगलट आले असून, जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात प्रांताधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. निलंबनासाठी ही बाब पूरक आहे.

पोलिसांतील ‘माफिया’ डीपीडीसीत गाजणार
महसूल यंत्रणेतील ‘वाळूचोरां’विरुद्ध कारवाईला सुरुवात झाली असली तरी, पोलिस विभागातील ‘माफिया’ मात्र मोकाट असल्याचे चित्र आहे. तसेच प्रशासनाकडे पोलिसांमधील ‘माफियां’ची यादी असताना त्यांची साधी चौकशीदेखील होत नसल्याची स्थिती आहे. पोलिसांतील ‘माफियां’संदर्भात मंगळवारी होणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

वाळूवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप
अवैध वाळू वाहतुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पदाधिकारी गुंतला आहे. तसेच सत्ताधारी पक्ष असल्याने प्रशासनावर दबाव आणून दोन वेगवेगळे क्रमांक असलेले एकच ट्रॅक्टर वापरले जात असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आला. याशिवाय राजकीय पक्षांच्या ‘वाळूमाफियां’विरुद्ध कारवाई करण्यासाठी भाजयुमोतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

नेमानेंविरुद्ध अनेक तक्रारी
नेमाने यांच्या निमखेडी रस्त्यावरील घराजवळ मार्च महिन्यात प्रशासनाने अवैध वाळूसाठा जप्त केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध बोगस सातबार्‍यासह अनेक तोंडी तक्रारीही जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. एमएच-19/बीएम-4464 क्रमांकाच्या एका डंपरविरुद्ध फेब्रुवारी 2013मध्ये एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होता. या डंपरशी या भागीदारांचा संबंध असल्याची तक्रार आहे. परवा पकडलेले डंपर माझ्या मालकीचे असले तरी, ते मी लेखी कराराने भाड्याने दिल्याचा दावा स्वप्निल नेमाडे यांनी केला आहे.