आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठय़ांना होईल लॅपटॉपची सक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-तलाठी स्तरावरील सर्व कामे ऑनलाइन आणि संगणकीकृत करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात ई-चावडीसारखा मोठा प्रकल्प सुरू करण्यासाठी तलाठी, मंडळाधिकारी यांच्याकडे लॅपटॉप असणे बंधनकारक असणार आहे. त्यांनी ते स्वखर्चाने घेणे अपेक्षित आहे. यापूर्वीच अशी सक्ती करण्यात आली आहे. उर्वरित लोकांसाठी आर्थिक सहाय उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासन करीत आहे.

संगणकीकृत सातबारा, शेतकरी, नागरिकांना आवश्यक मालमत्तेच्या नोंदी यासह विविध प्रशासकीय कार्यालयीन कामे ऑनलाइन करावी लागणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पातळीवरच्या जबाबदार अधिकारी, कर्मचार्‍याला कोडवर्ड देण्यात येणार आहेत. त्याचा पासवर्ड आणि डिजीटल स्वाक्षरी यांचा वापर करून मंडळाधिकारी आणि तलाठी कामे करू शकणार आहेत. प्रशासनाने यापूर्वीच प्रायोगिक तत्त्वावर मंडळ अधिकारी आणि काही महत्त्वाच्या गावांमध्ये संगणकीकृत सातबार्‍यासाठी तलाठय़ांना लॅपटॉप खरेदी करण्याची सक्ती केली होती. मोठय़ा गावांतील तलाठय़ांनी लॅपटॉप खरेदी केले आहेत.

ई-चावडीसाठी आवश्यक

ई-चावडी हा शासनाचा सर्वात मोठा ई-प्रकल्प ठरणार आहे. येत्या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याने मंडळ अधिकारी, तलाठीकडे लॅपटॉप असणे आवश्यक आहे. त्यावरून सर्व उतारे, नोंदी दिल्या जातील. शासकीय फी व्यतिरिक्त प्रिंट, लॅपटॉपच्या मेंटेनन्ससाठी नागरिकांकडून अत्यल्प शुल्क आकारण्याची मुभा तलाठय़ांना दिली.

प्रकल्प अंतिम टप्प्यात
ई-चावडीची अंमलबजावणी करण्याचे सारे सोपस्कार पूर्ण झाले आहेत. शासकीय पातळीवर येत्या 1 फेब्रुवारीपासून हा प्रकल्प सुरू होऊ शकतो. प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यास हा प्रकल्प सुरू होऊ शकेल. एनआयसीतर्फे या प्रकल्पाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशाने हा प्रकल्प सुरू होऊ शकेल.

प्रशासकीय पातळीवर विचार आहे सुरू


लॅपटॉप तलाठय़ांनी स्वत:च्या खर्चाने घ्यायचा आहे. मात्र, काही प्रमाणात आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत तलाठय़ांना अर्थसहाय करता येऊ शकते. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर विचार सुरू आहे. या योजनेतून आर्थिक मदत करण्याचा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचा मानस आहे.