आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ताप्रकरण: तानाजी, वीरेंद्र भोईटे यांची पोलिस कोठडीत रवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अँड.तानाजी भोईटे व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चौकशी केल्यानंतर बुधवारी सकाळी अँड.भोईटेंना पुणे येथून जळगावात आणल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर वीरेंद्र भोईटे व तानाजी भोईटे यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.ए.दाते यांच्यासमोर हजर केले असता वीरेंद्र यांना दोन तर तानाजी यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तानाजी भोईटे यांच्या आयसीआयसीआय बँकेतील 106 क्रमांकाच्या लॉकरमधून 272 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केले आहे.

भोईटे परिवारातील सदस्यांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे, नाशिक व जळगाव येथील पथकाने पुणे व जळगावातील मालमत्तेवर मंगळवारी चौकशी केली होती. यात भोईटेचे जळगावातील घर सील केले होते. तर पुण्याच्या बंगल्याची देखील झाडाझडती घेण्यात आली होती. या वेळी अँड.भोईटे यांच्यासोबतच वीरेंद्र व शिवाजी भोईटे तसेच लता भोईटे यांच्या घराचीदेखील पोलिसांनी झाडाझडती घेतली होती. कारवाईत वीरेंद्र यांच्याकडे 18 लाखांची तर तानाजी यांच्याकडे आठ लाखांची मालमत्ता सापडली होती. या प्रकरणी वीरेंद्र यांना मंगळवारीच अटक करण्यात आली होती तर तानाजी यांना बुधवारी सकाळी पुणे येथून जळगावात आणण्यात आले.

दुपारी न्यायालयात हजर
बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश दाते यांच्यासमोर दोघाना हजर केले. या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. वीरेंद्र यांच्याकडे 18 लाखांची संपत्ती कोठून आली. त्यांनी त्यांच्या मालकीच्या काही मालमत्ता विकलेल्या आहेत. या नेमक्या कोणाला व कोठे विकल्या आहेत. याचा शोध घ्यायचा आहे. आरोपींचे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. या मागणीसाठी पोलिस कोठडी मिळण्याची विनंती त्या अधिकार्‍यांनी न्यायालयाकडे केली.

कोठडीला वकिलाचा विरोध
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी मागितलेल्या पोलिस कोठडीला विरोध दर्शवित वीरेंद्र यांचे वकील अँड.आर.के. पाटील यांनी सांगितले की, वीरेंद्र यांच्या बंगल्याची पोलिसांनी झडती घेतलेली आहे. या झडतीत काही कागदपत्रे व इतर बाबी पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत. निव्वळ जबाबासाठी पोलिस कोठडी देणे योग्य होणार नाही. त्यामुळे पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी अँड. पाटील यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने वीरेंद्र यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.