आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंटामुक्ती पुरस्काराने पिंपळगावचा सन्मान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वरणगाव-बोदवड रस्त्यावरील पिंपळगाव खुर्दला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गंत तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला. यामुळे गावक-यांमधून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मिळणा-या तीन लाख रुपये निधीतून विकासाची कामे करण्यात येणार आहेत.
पिंपळगाव खुर्दची लोकसंख्या 2077 असून येथे 536 कुटुंबे राहतात. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या गावाची राजकीय क्षेत्रातील कामगिरी उजवी आहे. अरुण इंगळे पंचायत समिती सदस्य असून त्यांनी उपसभापती म्हणून काम केले आहे. अनिल पंडित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असले तरी सर्वजण गावाच्या विकासासाठी एकत्र येतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंच तुषार पाटील व सहका-यांनी गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी 27 सदस्यांची तंटामुक्त समिती तयार केली आहे. ही समिती गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक पातळीवरच सर्व वाद मिटवते. त्यामुळे पोलिस ठाण्यापर्यंत तक्रार जाण्याचे प्रमाण शून्य आहे. यामुळे तंटामुक्त गाव पुरस्कारासाठी गावाची निवड करण्यात आली. दरम्यान, आचारसंहिता लागू असल्याने होणारे पुरस्कार वितरण पोलिस निरीक्षकांच्याहस्ते करण्यात आले.
कामाचे समाधान
* केलेल्या कामाची दखल घेतल्याने समाधान वाटते. भविष्यात गावाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने चांगल्या योजना राबविण्यात येतील. पंचायत समिती सदस्य अरूण इंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, पोलिस पाटील उमाकांत महाजन व इतरांचे सहकार्य मिळाले. - तुषार पाटील, सरपंच, पिंपळगाव खुर्द
जबाबदारी वाढली - तंटामुक्ती अभियानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वच ग्रामपंचायत पदाधिका-यांसह आपली जबाबदारी वाढली आहे. तंटामुक्ती समितीला यापुढच्या काळातही सजग राहावे लागेल. नागरिकांनी या समितीवर जो विश्वास दाखविलेला आहे त्याला तडा जाणार नाही याची सर्वच जण काळजी घेऊ व गावाचे नावलौकिक करू. - एन.जी.राठोड, ग्रामसेवक, पिंपळगाव खुर्द