आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tapi Co operative Society Chairman Suresh Borole Blame To Society Employee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोरोले म्हणतात, मी नव्हे कर्मचारी दोषी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: तापी पतसंस्थेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सुरेश बोरोले यांची सध्या पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान बोरोले आपल्या व्यवहारांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याला आपण नाही तर कर्मचारीच दोषी असल्याचा पाढा बोरोले तपासाधिकार्‍यांपुढे वाचत आहेत.
तापी पतसंस्थेच्या चोपडा, जळगाव येथील शाखांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा घोटाळा झाल्याची तक्रार साहाय्यक निबंधकांनी केल्यामुळे चेअरमन डॉ. सुरेश बोरोले यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यादिवसापासून बोरोले हे फरार होते. चोपडा शाखेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तर जळगाव येथील गुन्ह्यात बोरोले पोलिसांना हवे होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना मुरबाळ येथून अटक केल्यानंतर त्यास न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस कोठडीत बोरोले यांना शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक विश्वास शित्रे यांनी बोरोलेंची चौकशी सुरू केली आहे. मात्र, तपासाधिकारी शित्रे यांच्या सर्व प्रश्नांना बोरोले यांचे ‘मी पैसे खाल्ले नाहीत, घोटाळ्यात माझा काही दोष नसून कर्मचारीच या घोटाळ्याला जबाबदार आहेत’ हेच त्यांचे उत्तर आहे. शित्रे यांनी शुक्रवारी बोरोले यांची चौकशी केली. त्यांच्या बॅँक खात्यांचीही शित्रे यांनी माहिती घेतली. मात्र, ठोस माहिती देण्यास अद्यापही बोरोले तयार नसल्याचे तपासाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. बोरोले यांनी घोटाळ्यातून मिळवलेली रक्कम कोणकोणत्या खात्यात गुंतविली आहे. याचीही माहिती पोलिस घेत आहेत. बोरोले यांना अद्यापही शहर ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.