आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापी नदीपात्रातील मालखेडा ठेक्याला ‘महसूल’चे अभय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - तापी नदीपात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणाºयांनी बुधवारी काढता पाय घेतला होता. मात्र, काही दिवसांनी पुन्हा मालखेडा ठेका अचानक सुरू झाला. केवळ प्रशासनाच्या आशीर्वादाने पुन्हा वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले आहे.

चोपडा तालुका हद्दीतील तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचे अवैधरीत्या उत्खनन होत आहे. जळोद गावाजवळ बुधगाव, मालखेडा, जळोद याठिकाणी रेती ठेका देण्यात आलेला होता. याच भागात प्रचंड प्रमाणात उपसा होत आहे. याबाबत प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे यांनी गेल्या महिन्यातच या वाळूच्या ठेक्यांचे प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे पत्र अप्पर जिल्हाधिकाºयांना पाठवले होते.

मात्र अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरून कोणतीही कारवाई न झाल्यानेच हे ठेके सुरू होते. दरम्यान, 24 जून रोजी अमळनेरच्या पाण्याबाबत ओरड झाल्याने हे सर्व ठेके रद्द झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. पण मालखेडा गावाचा ठेका अद्यापही सुरूच आहे. चौकशीची मागणी होत आहे.

महिनाभर प्रांताच्या अहवालाची दखल नाही
प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे यांनी 9 मे, 10 एप्रिल व 15 मे असे तीन प्रस्ताव अप्पर जिल्हाधिकारी खनिकर्म यांना पाठवले होते. परंतु त्यावर कारवाई तर झालीच नाही पण प्रचंड उपसा सुरू झाला. तातडीने दखल घेतली असती तर हे ठेके बंद झाले असते. याबाबत तक्रारी व गडबड दिसताच 24 जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी जळोद 2 चा वाळू ठेका रद्द करण्याचे आदेश पाठवले. ते सायंकाळी प्रशासनाला प्राप्त झाले तर उर्वरित दोन ठेक्यांना त्यांची मशिनरी काढून घेण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, मालखेडा ठेका प्रशासनच्या नाकावर टिच्चून सुरूच आहे. याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाणीटंचाईला ‘आमंत्रण’
० प्रस्ताव पाठविले अप्पर जिल्हाधिकाºयांकडे
० प्रांताधिकाºयांची वरिष्ठांशी चर्चा
० मशिनरी काढण्याची झाली होती कारवाई
० प्रचंड उपशामुळे पर्यावरणविषयक प्रश्न

तांत्रिक चुकीची दुरुस्ती
- मालखेडा गावाच्या वाळू ठेक्यासंदर्भातील प्रस्तावाबाबत माहिती घेतली असून तो आज जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवत आहे. हा प्रस्ताव तांत्रिक चुकीमुळे परत आला होता. त्याची दुरुस्ती झाली आहे. अजय मोरे, प्रांताधिकारी.
मालखेड्यावर कृपादृष्टी
मालखेडा गावाचा रद्द झालेला ठेका काही दिवसांनी पुन्हा सुरू झाल्याचे चित्र उभे राहिले. मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होऊनही मालखेडा ठेक्याची मुदत संपत कशी नाही? याबाबत प्रश्न आहे. तीन ठेक्यांचा प्रस्ताव पाठवूनही माशी शिंकली कुठे? हाच प्रश्न होता. मात्र, मालखेडा गावाचा प्रस्तावच प्रांत कार्यालयातून गेला नसल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. याबाबत प्रांताधिकारी अजय मोरे यांना विचारणा केली असता आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव रद्द करण्यासंदर्भात जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महसूल विभागाची मोठी कृपादृष्टी या ठेक्यावर आहे. राजकीयदृष्ट्या संबंधित लोकांचेच हे ठेके असल्याने महसूल विभागाने गंभीर कुचराई केली आहे, असा आरोप होत आहे. पर्यावरणाचीही हानी केली आहे. याबाबत दोषी कोण याची चौकशी होणे गरजेचे आहे.