आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापी नदीपात्रात सोडली राख; वीजनिर्मिती केंद्राचा अफलातून कारभार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची राखवाहिनी फुटल्यावर प्रशासनाने राखमिश्रित पाणी तापीनदीच्या पात्राकडे वळविले आहे. शनिवारी विरोधी पक्षनेत्यांनी प्रदूषणाबाबत कानउघाडणी केल्यानंतर महाजनको प्रशासनाने ही राखेची पाइपलाइन बंद केली. मात्र, राख प्रकल्पात साठवून ठेवता येत नसल्याने आता दररोज हजारो मेट्रीक टन राख नदीपात्रात सोडणे सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा वेल्हाळा अँश पॉड अर्थात बंडाकडे जाणारी राखवाहिनी शनिवारी फुटली होती. या वेळी विरोधी पक्षनेते खडसे येथून जात असल्याने हा प्रकार समोर आला होता. त्यांनी मुख्य अभियंता मनोहर गोडवे आणि उपमुख्य अभियंता आर.व्ही.तासकर यांची कानउघाडणी केल्यावर फुटलेली पाइपलाइन तत्काळ बंद करण्यात आली. वीजनिर्मितीची प्रक्रिया सुरू असल्याने राख इतर ठिकाणी सोडण्याची व्यवस्था नाही. प्रशासनाला वाहतुकीचा खर्च अधिक असल्याने हॉपरमधील राखही साठवून ठेवत नाही. यावर दीपनगर केंद्रातील काही अधिकार्‍यांनी पर्याय शोधला. राखमिर्शित पाणी थेट फेकरी नाल्यात सोडणे सुरू केले.

मात्र, दीपनगरच्या अधिकार्‍यांची ही शक्कल तापी नदीच्या मुळावर उठली आहे. फेकरी नाल्यातून शनिवारपासून दररोज हजारो मेट्रीक टन राख थेट नदीपात्रात मिसळणे सुरू आहे. फेकरी नाल्यावर बंधारा बांधल्याचा दीपनगर प्रशासन कांगावा करते. प्रत्यक्षात मात्र एक वर्षांपासून दगड मातीचा हा बंधारा पूर्णपणे तुटला आहे. यामुळे राखेचे लोट तापीच्या पात्रात मिसळले जातात. ऐन टंचाई स्थितीत राखेमुळे पिण्याचे पाणी दूषित करण्याचा गंभीर प्रकार दीपनगर प्रशासनाकडून होत आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी सूचना केल्यावरही अधिकारी त्यांना जुमानण्यास तयार नाहीत.

कारण, दीपनगर प्रशासनाने केंद्राकडून महामार्गावर येणारी राख बंद केली खरी; मात्र हीच राख फेकरी नाल्यातून तापीकडे सोडल्याने महामार्गापेक्षा जास्त प्रदूषण होत आहे. जळगाव येथील उपप्रादेशिक प्रदूषण अधिकारी ए.जे.कुडे, नाशिकचे अशोक फुलसे या गंभीर प्रकाराकडे फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय कारवाईसाठी धजावत नाहीत. परिणामी, प्रदूषणाला जबाबदार गृहीत धरून महाजनको आणि दीपनगरातील स्थानिक अधिकार्‍यांना जनक्षोभाला तोंड द्यावे लागेल.

राखेचे पाणी प्यावे लागेल
तापीपात्रात राख सोडली जाते. हतनूरमधून आवर्तन सुटल्यावर ही राख भुसावळ पालिकेच्या बंधार्‍यात अडकते. यामुळे भुसावळकरांना आता राखेचे पाणी प्यावे लागेल. यासंदर्भात महाजनको आणि दीपनगरच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करू.
-राजेंद्र चौधरी, पर्यावरणप्रेमी, फुलगाव

चौकशी करू; गळती बंद होईल
तापीनदीत मात्र राख कशी जाते ? याची माहिती नाही. आम्ही तर दुसर्‍या पाइपलाइनमधून राख बंडाकडेच सोडली आहे. प्रकल्पातच कोठेतरी पाइपलाइन फुटली असेल. या प्रकाराची संपूर्ण चौकशी करून ते तत्काळ बंद करण्यासाठी प्रयत्न करू.
-मनोहर गोडवे, मुख्य अभियंता, दीपनगर