आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवंगयुक्त दूषित पाण्याने तापी नदीत पोहणे झाले बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - तापी नदीचा समृद्ध वारसा लाभलेल्या भुसावळात नदीपात्रात दररोज मनसोक्त डुंबणा-यांची आणि नियमित व्यायाम म्हणून पोहायला जाणा-यांची संख्या दोनशे पेक्षा जास्त आहे. मात्र, तापीमध्ये सोडण्यात येणा-या सांडपाण्यामुळे हे पोहणे आता बंद झाले आहे. तवंगयुक्त, शौचालयाचे पाणी थेट नदीपात्रात येत असल्याने त्याची दुर्गंधी सुटते. यामुळे नियमितपणे पोहणा-यांना त्वचारोगाचा सामना करावा लागतो.
तापीपात्रात भुसावळ शहर आणि कंडारी येथील सांडपाणी सोडण्यात येते. याबाबत दैनिक दिव्य मराठीने सखोल वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर पोहण्याची हौस असलेल्यांनी कार्यालयात येवून व्यथा मांडली. भुसावळ शहरासह कंडारीमधील सांडपाणी कोणताही विचार न करता थेट तापीपात्रात सोडण्यात येते.
रेल्वे फिल्टर हाऊसच्या पूर्वेस 400 मीटर अतंरावरून हे पाणी पात्रात येते. कुबट आणि दुर्गंधीयुक्त या पाण्यामुळे तापीचे निर्मळ पाणीही दूषित होते. शौचालयांचे पाणी देखील नदीपात्रात येत असल्याने तापीला एखाद्या नाल्याचे स्वरुप आले आहे. याच ठिकाणी रेल्वे पंपिंग हाऊस असल्याने नदीपात्रात बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे येथे किमान पाच ते सहा फूट पाणी असते. रेल्वे, आयुध निर्माणी कर्मचारी आणि शहरातील प्रतिष्ठीत नियमित व्यायाम म्हणून येथे दररोज पोहण्यासाठी येत होते. मात्र, स्वच्छ पाणी दूषित झाल्याने पंपिंग हाऊसजवळील पोहणे बंद झाले आहे. त्यामुळे काही हौसी लांब अंतरावर काठावर थांबून व्यायाम करणे पसंत करतात.
शहात पहाटे तापी नदीकाठावर फिरायला जाणा-यांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र, मैलायुक्त सांडपाणी, सांडपाण्यातील अळ््या, किड्यांमुळे दुर्गंधी सुटते. यामुळे पपिंग हाऊसकडील तापी काठावर फिरायला जाणा-यांची संख्याही रोडावली आहे.
मजाच गेली - तापीनदीत पोहण्याची मजा वेगळीच आहे. व्यायामाचा एक चांगला प्रकार म्हणून उच्च् दर्जाचे अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी याच ठिकाणी पोहण्यासाठी येत होते. मात्र आता सांडपाण्याचे प्रमाण वाढल्याने आम्ही तापी नदीत पोहायला जाणे बंद केले आहे. - बी. जी. नागरे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी
प्रकार थांबवा - पोहणे हा प्रकार आरोग्यासाठी उत्तम आहे. मात्र तापी नदीमधील पाणी दूषित झाले आहे. या पाण्यात पोहल्याने त्वचाविकार होतात. त्यामुळे आता तापीमध्ये पोहायला जाणे बंद केले आहे. शहरात इतरत्र कुठेही जलतरण तलाव नाही. यामुळे हिरमोड होतो. पालिकेने निदान तापीत येणारे सांडपाणी थांबविणे गरजेचे आहे. - नरेश पटेल, भुसावळ