आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षयरोग नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांकडून माहिती संकलन सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर वेळेवर उपचारासाठी जिल्ह्यातील टीबी युनिट पथकांमध्ये तीन केंद्रांची वाढ करण्यात येऊन ती 12 झाली आहेत तर थुंकी तपासणी केंद्रांची संख्या 45 वरून 53 करण्यात आली आहे. जिल्हाभरातील संशयित रुग्णांवर खंड न पडता उपचार होण्यासाठी आता खासगी डॉक्टरांकडील रुग्णांची माहितीही संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चुकीच्या जीवनशैलीमुळे मोठय़ा प्रमाणात आरोग्य बिघडत असून त्याचा परिणाम क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्याची स्थिती पाहता डिसेंबर 2013 मध्ये तब्बल 1600 थुंकीचे नमुने तपासण्यात आले होते. सद्य:स्थितीत दर एक लाख लोकसंख्येमागे 98 रुग्ण क्षयरोगाचे निष्पन्न होत असल्याचे गेल्या तीन महिन्यातील सरासरीवरून लक्षात येते. यावरून क्षयरोगासंदर्भात मोठय़ाप्रमाणात जनजागृती होणे गरजेचे असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

अशी आहेत केंद्रे
सद्या जिल्ह्यात 9 टीबी युनिट होते. त्यात भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, जळगाव ग्रामीण, धरणगाव, जामनेर, पारोळा, रावेर, यावल हे युनिट कार्यरत होते. त्यात 3 युनिट नव्याने मंजूर झाले असून पाचोरा, मुक्ताईनगर व अमळनेर या युनिटची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे थुंकी तपासणी केंद्रांची ( डीएमसी) संख्या 45 होती. त्यात वराडसीम, रांजणगाव, गोरगावले, म्हसावद, नेरी, वाघोड, कजगाव, जानवे या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नव्याने केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी केंद्र सुरू होणार असल्याने आता या परिसरातील नागरिकांना लक्षणे जाणवल्यास थुंकी तपासून निदान करता येणार आहे.

लक्षणे ओळखून सतर्क व्हा
दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ बेडखायुक्त खोकला येणे, भूक मंदावणे, सायंकाळी ताप येणे, वजन कमी होणे, बेडख्यातून रक्त पडणे ही क्षयरोगाची लक्षणे असतात. ही लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डीएमसी केंद्रात तपासणी करून घेणे गरजेचे असते.

खासगी हॉस्पिटलकडील माहिती मागवली
क्षयरोगाचा प्रसार हा संसर्गातून होत असतो. शासकीय यंत्रणेकडून उपचार सुरू असलेल्या रुग्णांवर औषधोपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. परंतु खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांची माहिती शासकीय पातळीवर नसल्यामुळे त्या रुग्णांच्या माध्यमातून संसर्ग टाळण्यासाठी अशा रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी डॉक्टरांकडील रुग्णांची माहिती नोंदवण्याचे पत्र जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरांना देण्यात आले आहे.

रूग्णांवर असते संपूर्ण लक्ष
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर उपचार घेणार्‍या रुग्णांची संपूर्ण माहिती असल्यामुळे संबंधित रुग्णासाठीची औषधी ही त्या त्या गावातील आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका अथवा अन्य जिल्हा परिषदेशी निगडित कर्मचार्‍यांकडे असते. 6 ते 8 महिन्यापर्यंत रुग्णाच्या हालचालींवर लक्ष ठेवून उपचारात खंड पडणार नाही याची ते काळजी घेत असतात. त्यामुळे आमच्या देखरेखीखाली उपचार पूर्ण होण्यास मदत होते. डॉ.संजय चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी.