आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात ‘टीडीआर’चे दर दुप्पट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका हद्दीत वाढीव बांधकाम करावयाचे झाल्यास लागणार्‍या ‘टीडीआर’ (विकास हक्क हस्तांतरण)चे दर वर्षभरात दुपटीवर गेले आहेत. तसेच आरक्षण टाकण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात ‘टीडीआर’ देण्याची प्रकरणे पालिकेकडून निकाली निघत नसल्याची स्थिती आहे.

महापालिका हद्दीत विविध विकास कामांसाठी जागांवर आरक्षण टाकले जाते. त्या बदल्यात पैसे देण्याची पालिकेची सध्या आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे काहींनी ‘टीडीआर’साठी प्रकरणे दाखल केली होती. हे हक्क विकून जमीन गेलेल्यांना आर्थिक मोबदला मिळू शकतो. त्यासाठी वर्षभरात सुमारे 45 प्रस्ताव दाखल झाले होते; मात्र प्रशासनाने त्यावर निर्णय घेतला नसल्याचा आरोप स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा यांनी केला आहे.

नवीन प्रकरणे मंजूर होत नसल्याने ज्यांच्याकडे ‘टीडीआर’ हक्क आहेत, त्यांची मक्तेदारी सुरू झाली आहे. तसेच ‘टीडीआर’चे वर्षभरातील दर पाहता सध्या ‘सी’ झोनचे दर 50 ते 75वरून 160 ते 180 रुपये प्रतिचौरस फूट झाले आहेत. त्याचप्रमाणे ‘बी’ झोनचे दर 600 ते 650वरून 750 ते 780पर्यंत गेले आहेत. प्रशासनाने प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्यास ‘टीडीआर’चे वाढलेले दर काही प्रमाणात कमी होणे शक्य आहे.

झोननिहाय दरनिश्चिती
नगररचनाने शहराची 3 झोनमध्ये वर्गवारी केली आहे. जुना गावठाण झोन ‘ए’मध्ये मोडतो. यात 1 हजार चौरस फुटांमध्ये 1500 चौरस फूट बांधकाम नियमात बसते व त्या ठिकाणी टीडीआर लागू होत नाही. झोन ‘बी’मध्ये गावठाण वगळून जुन्या हद्दीतील संपूर्ण भाग येतो. झोन ‘सी’मध्ये मनपाचा वाढीव भाग येतो. उदा. पिंप्राळा, मेहरूण, खेडी, निमखेडी हे झोन ‘सी’ मध्ये येतात. ‘बी’ किंवा ‘सी’ झोनमधील टीडीआर हस्तांतरण त्याच झोनसाठी लागू होते. गरज भासल्यास ‘बी’ झोनचे टीडीआर ‘सी’ झोनसाठी वापरता येते; मात्र ‘सी’चा टीडीआर ‘बी’ झोनसाठी वापरता येत नाही.

आरक्षणात गेलेल्या जमिनीतून घेता येतो ‘टीडीआर’
उद्यान, रस्ते किंवा अन्य उद्देशासाठी महापालिकेकडून एखाद्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात येते. आरक्षण टाकल्याचा मोबदला संबंधित शेतकरी किंवा व्यक्तीस रोखीने वा जेवढी जमीन आरक्षित झाली असेल, तेवढय़ा चौरस फुटांचे ‘विकास हक्क हस्तांतरण’ (टीडीआर) प्रमाणपत्र घेण्याचा पर्याय खुला असतो. संबंधिताने टीडीआर प्रमाणपत्र घेतल्यास तो कुठल्याही व्यक्तीला आवश्यकतेप्रमाणे त्याचे हक्क विकून पैसे वसूल करून आपला मोबदला मिळवू शकतो.

‘टीडीआर’ म्हणजे काय ?
नियमानुसार बांधकाम करत असताना प्लॉटच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात बांधकाम करता येते. उदा. 1 हजार चौरस फुटांचा प्लॉट असल्यास तळमजल्यावर संपूर्ण बांधकाम करता येत नाही. पार्किंग व हवेसाठी पोर्च सोडावा लागून प्रत्यक्ष 600 किंवा 650 चौरस फूट बांधकाम होते; मात्र संबंधित प्लॉटमालकास उरलेले 350 किंवा 400 चौरस फूट बांधकाम गच्चीवर करता येते. त्यापेक्षा अधिक बांधकाम करावयाचे असल्यास ‘टीडीआर’ -ट्रान्सफर डेव्हलपमेंट राइट (विकास हक्क हस्तांतरण) विकत घ्यावे लागतात.