आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher And Private Coaching Classes Issue At Jalgaon

शिकवणी घेणार्‍या शिक्षकांवर कारवाई! ऑगस्टपासून शिक्षण विभागाचे पथक ठेवणार नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खासगी शिकवणी घेणार्‍या शिक्षकांवर आळा घालण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने 1 ऑगस्टपासून धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांचे पथक कार्यवाही करणार आहे.
शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकाला खासगी शिकवणी घेण्यास शासनाने मनाई केली आहे. मात्र, तरीदेखील अनेक शिक्षकांची मनमानी कायम असून सर्रासपणे शाळेतील शिक्षकीपेशा सांभाळून खासगी शिकवणी (क्लास) घेतली जात आहे. याविषयी काही जणांच्या तक्रारीदेखील शिक्षणाधिकारी यांच्याकडे आल्या आहेत. परंतु, आजवर खासगी क्लास घेणार्‍या कुठल्याच शिक्षकावर शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही. दरवर्षी शिक्षण विभागाकडून शिकवणी घेणार्‍यांवर कारवाई करण्याचा फतवा काढला जातो. प्रत्यक्षात तो आदेश कागदावरच राहत असून एकाही शिक्षकावर कारवाई केली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी, माहिती असतानाही पथक त्या शिक्षकांपर्यंत पोहचू शकत नाही. माध्यमिक शिक्षण विभागाने नुकतेच याबाबत आदेश काढले असून 1 ऑगस्टपासून खासगी शिकवणी घेणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रार आली तरच कारवाई
जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी यांचे पथक तर ग्रामीण भागात गटशिक्षणाधिकारी यांचे पथक कार्यरत राहणार आहे. 1 ऑगस्टपासून तक्रारी आलेल्या शिक्षकांवर धडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खासगी शिकवणी घेत असलेल्या शिक्षकांविषयी आता तक्रारी आल्यास त्यांची गय केली जाणार नाही. परंतु, तक्रारी येणार नाही, तोपर्यंत कुठलीच कार्यवाही केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पाच मुलांना शिकवता येते
शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकाला फक्त पाच मुलांना शिकवता येऊ शकते. त्यासाठी त्याने शाळेकडे नोंद करायला हवी. तसेच शिकवणीतून येणारा पैसा त्याने स्वत:च्या उत्पन्नात दाखवायला हवा. मात्र, शाळेत शिक्षक असलेल्यांना खासगी शिकवणी घेण्याचा अधिकार नाही. जादा तासाच्या नावाखाली पूर्वप्राथमिकपासूनच शाळांमध्ये खासगी वर्ग घेतले जात आहेत. मात्र, जादा तास घ्यायला मनाई करता येत नाही, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. परंतु यातून प्रतिविद्यार्थ्यांकडून 300 ते 400 रुपये घेतले जात आहेत. बहुतांशी शाळांमध्ये जादा तासाची सक्ती केली जाते. पण अपवादात्मक काही शाळांमध्ये सक्ती नसल्याने ती पालकांसाठी जमेची बाब म्हणता येईल.
खासगी क्लासेसबाबत वारंवार तक्रारी येतात. त्यानुसार 1 ऑगस्टपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. तक्रारी आल्यानंतरच कारवाई करणे शक्य होणार आहे. प्रत्येक तालुक्यावर गटशिक्षणाधिकारी यांना याबाबत आदेश दिले आहेत. शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक