आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे शिक्षकच झाले परीक्षार्थी..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी आत्मविश्वास व प्रेरणा अनुभूती अभियानांतर्गत रविवारी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे नेहमीच विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे शिक्षक आज स्वत: परीक्षार्थी झाल्याचे चित्र दिसून आले. अनुभूती अभियानांतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 700 प्राथमिक आणि 425 माध्यमिक शिक्षकांनी परीक्षा दिली.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे शिक्षकांसाठी आत्मविश्वास व प्रेरणा अनुभूती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाचन साहित्यावर आधारित लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी सत्तर टक्के शिक्षक स्वयंप्रेरणेने उपस्थित होते. शहरातील जिजामाता कन्या शाळा, एल. एम. सरदार उर्दू हायस्कूलमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती शिवाजी दहिते, शिक्षण विस्तार अधिकारी टी. पी. शिंदे, शशिकांत साळुंखे, केंद्रप्रमुख संतोष पाटील, अविनाश पवार यांनी उपस्थित शिक्षकांचे स्वागत करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. परीक्षेला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचबरोबर दीपस्तंभ संस्थेतर्फे शिक्षकांना पालकमित्र ही पुस्तिका भेट देण्यात आली. जिजामाता कन्या शाळेत सी.टी. पाटील तर एल.एम. सरदार हायस्कूलमध्ये र्शीमती अन्सारी यांनी केंद्रसंचालक म्हणून काम बघितले. शहराशिवाय साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल, शिरपूर येथील पी.बी.एम. हायस्कूल, शिंदखेडा येथील गल्र्स हायस्कूल येथील केंद्रांवर परीक्षा झाली. परीक्षेत 1 हजार 700 प्राथमिक आणि 425 माध्यमिक शिक्षक सहभागी झाले.
हा उपक्रम स्तुत्य असून, या अभियानाची खरोखरच गरज होती. यातून शिक्षकांच्या विचारांची दिशा बदलणार आहे. शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य वाढून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. यापुढेही असा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण विभागाकडून सहकार्य केले जाईल.शिवाजी दहिते, शिक्षण सभापती जिल्हा परिषद
शिक्षकांचे अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम चांगला आहे. भरकटलेल्या शिक्षकांना या उपक्रमामुळे दिशा मिळेल.नम्रता पाटील, शिक्षिका
या परीक्षेमुळे शिक्षकांना आत्मविश्वास व प्रेरणा मिळणार आहे. आगामी काळातही हा उपक्रम राबविण्याची गरज आहे. शिक्षकांना येणार्‍या अडचणींचा विचार या उपक्रमातून झाला.नानासाहेब बोरसे, मुख्याध्यापक