आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दांपत्याचा देहदानाचा संकल्प,बुद्धगया वाराणसी परिसरातून परतल्यानंतर घेतला निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे : देहनश्वर अाहे. अायुष्याच्या अखेरीस राख होण्याएेवजी मरणोत्तरही समाजासाठी उपयोगी पडावे, याच उद्देशाने शहरातील श्रीराम अरुणा पानपाटील या शिक्षक दांपत्याने नववर्षाच्या सुरुवातीला देहदानाचा संकल्प केला आहे.
 
एवढेच नव्हे, तर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन तसा रीतसर अर्जही केला आहे. विशेष म्हणजे, बुद्धगया, वाराणसी भेटीनंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती श्रीराम पानपाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली आहे. 
 
आजवर सुमारे ३० वर्षे शिक्षकी सेवेतून विद्यार्थी समाज घडविण्याचे काम श्रीराम रामदास पानपाटील यांनी केले. काही महिन्यांपूर्वीच ते सेवेतून निवृत्त झाले, तर त्यांच्या पत्नी अरुणा पानपाटील या अजूनही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 
सेवानिवृत्तीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये पानपाटील दांपत्याने बिहारमध्ये असलेल्या बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी, श्रावस्ती, उत्तर प्रदेशातील कपिलवस्तू, वाराणसी, काशी तसेच नेपाळमधील काठमांडू, पशुपतिनाथ, पोखरा आदी ठिकाणी भेटी दिल्यात. 
 
बौद्ध स्थळ आणि वाराणसी, काशी येथे मृतदेहांचा थेट गंगेत होणारा अंत्यविधी, तर दुसरीकडे हरिश्चंद्र घाटावर दरदिवशी सुमारे २५ ते ३० मृतदेहांचे होणारे दहनही त्यांनी पाहिले. मृत्यू अटळ असला तरी मृत्यूनंतरही देह समाजोपयोगी येऊ शकतो.
 
जीवनाचे खरे सार बुद्धगया आणि वाराणसी-काशी येथून मिळाले. यानंतर घरी आल्यावर पानपाटील दांपत्याने देहदानाचा संकल्प केला. या संकल्पापूर्वी त्यांनी दोन्ही मुले स्मितलकुमार अमोलकुमार यांनाही विश्वासात घेतले. त्यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला पानपाटील दांपत्याने देहदानाचा संकल्प केला.
 
शहरापासून जवळ असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन त्यांनी तसा अर्ज भरून दिला. पानपाटील कुटुंबीयांशी जवळीक असलेले डॉ. व्ही. के. सैंदाणे यांनी त्यासाठी मदत केली. त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला.
 
श्रीराम पानपाटील यांनी आजवर न्यू सिटी हायस्कूल, आर. के. चितळे जे. आर. सिटी विद्यालयात सेवा बजावली आहे, तर त्यांच्या पत्नी अरुणा या सध्या कमलाबाई कन्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचे शिक्षण क्षेत्रातून काैतुक केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...