आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची दहा वर्षांपासून स्वखर्चातून स्कूल बस सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सर्वसाधारण परिस्थितीतून अालेल्या सात शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करताना सामाजिक वसाही जाेपासला अाहे. स्वखर्चातून माेफत स्कूल बससह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य माेफत वाटप करत अाहेत. प्रसिद्धीचा बडेजाव न करता तब्बल १० वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम राबवणारे शिक्षक खऱ्या अर्थाने दीपस्तंभच अाहेत.

जळगाव शहरातील खेडीतील सद्गुरू प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा अनाेख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अापलीशी वाटू लागली अाहे. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी एमअायडीसी किंवा जवळपासच्या खेड्यातील हाेते. त्यांच्या येण्या-जाण्याची समस्या हाेती. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डाॅ. नारायण खडसे यांनी स्कूल बस उपलब्ध करून दिली, परंतु या स्कूल बसच्या खर्चाची जबाबदारी शिक्षकांनी अापल्या खाद्यांवर घेतली. बसचालकाचे वेतन अाणि डिझेलचे पैसे शिक्षक देऊ लागले. यासाठी महिन्याला ३५ ते ३८ हजार रुपये खर्च येत अाहे. स्कूल बसचे वार्षिक बजेट अडीच लाखांच्या जवळपास असून हा खर्च सात शिक्षक करत अाहेत. पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असणाऱ्या या शाळेत ३७६ विद्यार्थी अाहेत.

शाळेत येणारे सर्वच विद्यार्थी दुर्बल घटकातील
त्यांना गणवेश, बूट, दप्तर अाणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारीही शिक्षकांनी घेतली. यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च ते करत अाहेत. सर्व शिक्षक मिळून स्कूल बस व साहित्य वाटपासाठी वर्षाला साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च अापल्याच पगारातून करत अाहेत. मुख्याध्यापिका गायत्री भंगाळे व शिक्षक लीलाधर नारखेडे, शिल्पा झाेपे, गणेश लाेडते, भूषण जाेगी, जावेद तडवी, पूनम चाैधरी हे काम गेल्या १० वर्षांपासून करीत अाहेत.

एका विद्यार्थ्यास घेतात दत्तक
अाई-वडिलांचे छत्र हरवलेले, गरिबीमुळे शिक्षण न घेऊ शकणाऱ्या एका विद्यार्थ्यास एक शिक्षक दरवर्षी दत्तक घेतात. प्रत्येक वर्षी एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी हे शिक्षक उचलत अाहेत.

गुरूंचा लाैकिक वाढवला
शिक्षक संघटनांचे राजकारण, हक्क व पगारासाठी अांदाेलन करणाऱ्या शिक्षकांपेक्षा खेडीतील या शिक्षकांनी वेगळा अादर्श निर्माण केला अाहे. यातील एकही शिक्षक खासगी शिकवणीसुद्धा घेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या गुरूंबद्दल अादर निर्माण झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...