आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक पतपेढीच्या सभेत ‘दे दणादण’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - संस्कारित पिढी घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना समाजात गुरूचे स्थान आहे. परंतु या गुरुजींनीच राजकीय अस्तित्वासाठी थेट हाणामारी करत एकमेकांचे कपडे फाडल्याची घटना रविवारी घडली.

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नागरी सहकारी पतपेढीची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी 1 वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. संस्थेचे अध्यक्ष संभाजी पाटील अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीचा अर्धा तास सभा शांततेत सुरू होती; पण विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू झाले, त्यावेळी मात्र सभासदांमध्ये कुजबुज सुरू झाली. एकामागून एक विषय पुढे येत गेले. प्रश्न विचारणे सुरू होते आणि खुलाशाची मागणी कायम होती. अशातच संस्थेतील वातानुकूलित यंत्र व कर्जाच्या वाटपातून फुगलेला नफ्याचा आकडा या मुद्यावरून वादाला सुरुवात झाली.

अहवालातील चुका गंभीर असल्याचे सांगत काही सदस्यांनी परिपत्रक काढण्याची मागणी केली. तसेच प्रिंटिंगचे बिल देऊ नये, असा आग्रह धरण्यात आला. रावेरचे सुनील महाजन यांनी अध्यक्ष मनमानी व हुकूमशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप केला. एरंडोलचे संचालक राजेंद्र देशमुख यांनीही कारभारावर टीका केली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. यात अनेकांचे कपडे फाटले, चष्मे तुटले. गर्दीत तुडवले गेल्याने काहींना गंभीर दुखापती झाल्या.

अध्यक्षांना घेरले
या गोंधळात अध्यक्षांसह संचालक मंडळाने सर्व विषय मंजूर असल्याची घोषणा करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी त्यांना व्यासपीठावरच घेरले. मानद चिटणीस अजय देशमुख यांनाही धक्काबुक्की झाली. सभासदांमध्ये जुंपलेली बघून अनेक संचालकांनी गर्दीचा फायदा घेत पोबारा केला.

एसी, कूलरची नोंद नाही
अध्यक्षांनी चार वर्षांत जामीनकीच्या कर्जाची र्मयादा वाढवली नाही. पर्यायाने स्पेशल कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे पतपेढीचा नफा फुगलेला दिसतो. संस्थेला दोन एसी व वॉटर कूलर भेट दिल्याची कुठेही नोंद नाही. लेखापालाला अँडव्हान्स पाच लाख दिले. ही पद्धत व सभेतील गोंधळ चुकीचाच आहे. एस.डी.भिरूड, टीडीएफ जिल्हाध्यक्ष.

भ्रष्टाचार सिद्ध कराच
संस्थेत भ्रष्टाचार नाही. सिद्ध करून दाखवल्यास सर्व संचालकांसह राजीनामा देईन. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी हा गोंधळ केला. संस्थेची बदनामी केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू. वेळ प्रसंगी त्याचे पदही रद्द होऊ शकते. संभाजी पाटील, अध्यक्ष, शिक्षक पतपेढी

पुढील वर्षी निवडणूक
या संस्थेत पाच वर्षांनंतर सत्तांतर झाले होते. आता पुन्हा 2014 मध्ये निवडणूक आहे. 12 हजार 245 सभासद असलेल्या तसेच कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या पतपेढीवर सत्ता मिळवण्यासाठीच निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी स्वत:ला ‘प्रेझेंट’ केल्याची चर्चा आहे.