आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरल’चे कामबंद करा; शिक्षकांना शिकवू द्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शाळांमध्ये घटक चाचणी परीक्षा, १५ आॅगस्टची तयारी, एमटीएस, आम आदमी विमा योजना, सावित्रीबाई फुले योजना आदी शिष्यवृत्तींचे फॉर्म भरण्याचे काम सुरू असताना सरल डाटाबेसमध्ये माहिती भरण्याची ही वेळ अत्यंत चुकीची आहे. त्यातच सरलमध्ये माहिती भरण्यात चूक झाल्यास मुख्याध्यापक शिक्षकांना तुरुंगात टाकण्याची भाषा शिक्षणमंत्री करीत आहेत. त्यांना तुरुंगाची भाषा शोभते का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध शिक्षक भारतीच्या माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात रवविारी आयोजित निर्धार मेळाव्यात करण्यात आला.
शाळा शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सप्टेंबर रोजी राज्यभर धरणे आंदोलन तर ऑक्टोबरपासून राज्यव्यापी सत्याग्रह करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष नारायण वाघ अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यात शाळा शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. १८०० स्वयंअर्थशासित ५००० शाळांना शासन मान्यता देणार आहे. अनुदानित शाळा बंद करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या हजारो संख्येने जागा रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांची संख्या नाममात्र असूनही भरती जाणीवपूर्वक रोखण्यात आलेली आहे. राज्यात ६० हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असताना एक लाख शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचा सरकारचा छुपा डाव आहे. विषयनिहाय शिक्षक मिळणे हा वदि्यार्थ्यांचा अधिकार असून रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे करण्यात आली.

शिक्षक भारतीच्या मागण्या
नवीनशिक्षक भरती करा, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडवा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल जाहीर करून शिपाई, प्रयोगशाळा सहायक, ग्रंथपाल, लिपिक यांची पदे संचमान्यतेत दाखवावी, २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा.

अपमान सहन करणार नाही
सरलडाटाबेसमध्ये माहिती भरण्यासाठी अगोदर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करा. एकेका वदि्यार्थ्याचे ८० कॉलम भरायचे आहेत. पालकांची आणि शिक्षकांची खासगी माहिती सरलमध्ये मागवण्यात आली आहे. वदि्यार्थ्यांवर माहिती आणण्याचे दडपण आल्यामुळे ते शाळेला दांडी मारत आहेत. त्यामुळे शिक्षक पालक चिंतेत आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये ऑनलाइन माहिती भरण्याची पुरेशी व्यवस्था नाही. सर्व्हर वारंवार डाऊन असते. नेटचा स्पीड, भारनियमनामुळे फॉर्म भरणे अत्यंत कटकटीचे झाले आहे. त्यामुळे सरलचे काम बंद करा शिक्षकांना शिकवू द्या, अशी मागणी निर्धार मेळाव्यात करण्यात आली. शिक्षकांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असाही इशारा देण्यात आला.