आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपसी बदल्यांना ब्रेक;शिक्षकांचे प्रश्न अडकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे आपसी बदलीच्या प्रश्नाला ब्रेक लागला आहे. यासंदर्भात दोनदा शिक्षण सचिव कार्यालयाशी पत्रव्यवहार झाल्यानंतरही शिक्षणाधिकारी कार्यालयाला बदलीसंदर्भात कोणताच आदेश प्राप्त झालेला नाही. परिणामी शिक्षकांचा बदलीप्रश्न अध्र्यावर येऊन अडकला आहे.

गेल्या वर्षी प्रशासकीय बदलीने गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या सोईसाठी शासनाने तालुक्यांतर्गत आपसी बदलीचा फंडा अवलंबला. त्यासाठी शासन आदेशानुसार 7 नोव्हेंबरपर्यंत आपसी बदलीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. जिल्ह्यातून त्यासाठी 60 प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यापैकी 44 प्रस्ताव बदलीसाठी पात्र ठरले. तर 16 प्रस्ताव फेटाळण्यात आले. 12 नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडणे अपेक्षित असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. परिणामी बदलीसंदर्भात शिक्षण विभागाने शिक्षण सचिव कार्यालयाशी पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागवले. मात्र, त्याबाबत कोणतेच उत्तर आलेले नाही.आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाने दोन वेळेस शिक्षण सचिव कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे ; परंतु सचिव कार्यालयाकडून कोणतेच उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे आपसी बदलीचा प्रश्न मधेच बारगळला आहे. दरम्यान शिक्षकांच्या मुद्दय़ावर आंदोलन करणार्‍या शिक्षक संघटनांनीही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे अद्याप तरी या मुद्दय़ावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. बदलीचा प्रश्न बारगळल्याने शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संघटनांनी घ्यावा पुढाकार
संघटनांनी मंत्रालयात विषय लावून धरल्याने आपसी बदल्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्ह्यातील बदली प्रक्रिया मंदावल्याने शिक्षक संघटनांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. एरवी शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज उठवणार्‍या संघटनांना सध्या तरी आपसी बदलीच्या विषयाचा विसर पडलेला आहे. अद्याप कोणत्याच संघटनेने या विषयाबाबत पुढाकार घेतलेला नाही.