आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांची रिक्त पदे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून भरण्याचा ठराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जिल्ह्यातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत डेंग्यूप्रश्नी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी दुपारी ही बैठक झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण आरोग्य सभापती नूतन पाटील, महिला-बालकल्याण समितीच्या सभापती वंदना गुजर, कृषी पशुसंवर्धन सभापती लीलावती बेडसे, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते. बैठकीत अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेविषयी शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्रवीण पाटील यांना विचारणा करण्यात आली. समायोजनानंतरही अनेक शिक्षकांना सामावून घेण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला. धुळे तालुक्यात १७, साक्री तालुक्यात ४६, शिरपूर तालुक्यात ७०, तर शिंदखेडा तालुक्यातील ७६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आतापर्यंत २२४ शाळा डिजिटल झाल्या आहेत. १६ वर्गखोल्यांसाठी एक कोटी आठ लाख, आदिवासी शाळांसाठी ८५ लाखांची मागणी केल्याची माहिती शिक्षणाधिकारी देसले यांनी दिली. शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून रिक्त पदे भरावी, असा ठराव करण्यात आला. बैठकीत जिल्ह्यातील डेंग्यूची स्थिती, बाधित रुग्णांची संख्या, किती गावांमध्ये फवारणी करण्यात आली? आरोग्य विभागाकडून होणारी कार्यवाही याबाबत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे यांना विचारणा करण्यात आली. यावर डॉ. मोरे यांनी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. डेंग्यूसारख्या आजाराबाबत आकडेवारी नसल्यामुळे आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. शिवाय अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण कुठे गेले? असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला. साक्री तालुक्यातील नवापाडा रुग्णालयाची दुरवस्था, औषध खरेदी, नवीन रुग्णालयाच्या बांधकाम प्रक्रियेवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

लेटलतीफ अधिकारी...
दुपारी दोन वाजेची निर्धारित बैठक अडीच वाजता सुरू झाली. बैठक सुरू झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने दुपारी तीन वाजता उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे हे दाखल झाले. त्यानंतर चार वाजून पाच मिनिटांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. चव्हाण आले. त्यांना पदाधिकाऱ्यांनी तुम्ही उशिरा का आलात? असा प्रश्न विचारला. दरम्यान, गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या बैठकीस डॉ. चव्हाण गैरहजर असल्यामुळे सभापती श्रीमती पाटील यांनी त्यांची कानउघाडणी केली होती.

दुष्काळाच्या ठरावाचे झाले तरी काय?
जिल्ह्यास दुष्काळी म्हणून जाहीर करा, असा ठराव गेल्या महिन्याच्या बैठकीत झाला होता. या ठरावाचे काय झाले? प्रशासनाला तो पाठविण्यात आला का? असे प्रश्न या वेळी सभापती गर्दे यांनी उपस्थित केले. तसेच त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे काय? याचीही विचारणा करण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काही प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

महाडची आठवण
महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात अशी परिस्थिती उद‌्भवू शकते. त्यासाठी काही योजना आहे का? याबाबत बैठकीत विचारणा झाली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाय. जी. बिऱ्हाडे यांनी शासनाकडून पूरहानी दुरुस्तीबाबत पत्र आले असल्याचे सांगितले. यात जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेले रस्ते, पूल यांची माहिती शासनाला कळविणार असल्याचे ते म्हणाले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...