आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Technical Training Institute At Jalgaon For Blind Person

तंत्रज्ञानाच्या मदतीने दृष्टिहीन बांधव प्रकाशयुगाकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दृष्टिहीन बांधव कोणत्याही प्रकारचे काम करू शकतात. असे वाक्य प्रत्यक्षात उतरवित पुणे येथील टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या (टीटीआय) मदतीने मूजे महाविद्यालयात दृष्टिहीन बांधवांना प्रकाशयुगाकडे नेण्याची नांदी सुरू झाली आहे.

टीटीआय ही संस्था पुण्यात अंध बांधवांसाठी काम करीत आहे. जळगावसारख्या शहरातही अंध बांधवांचे आयुष्य उज्ज्वल व्हावे यासाठी शनिवारपासून मू.जे. महाविद्यालयात संस्थेने अंध बांधवांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा सुरू झालेली आहे. त्यात अंध व्यक्तीसाठी असलेल्या विविध टेक्नॉलॉजीचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. यात संगणक, मोबाइलचा वापर, विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने वाचन, लेखन, डिजिटल टॉकिंग बुक प्रोजेक्ट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एका ठिकाणाहून दुसर्‍या जागी जाण्यासाठी मार्गात असलेले चिन्ह, अडथळे ओळखण्याचे तंत्रज्ञान अंध बांधवांना दाखविले. तसेच प्रात्यक्षिक करून घेतले. त्यासाठी टीटीआय संस्थेकडून डॉ.होमियार मोबेडजी, हाजीक ताहा आणि हनुमंत तल्हार हे तीन प्रशिक्षक आले होते. विशेष म्हणजे तीनही प्रशिक्षक हे अंध होते. अंध बांधवांसाठी उपयोगी ठरणार्‍या सॉफ्टवेअरची निर्मिती झाली आहे. मात्र, अद्याप त्याचा वापर करणारे कमी आहेत. त्याचा वापर वाढून अंध बांधवांनी डोळस व्यक्तीप्रमाणे सर्व कामे करावी अशा उद्देशाने टीटीआय माहिती देण्यासाठी देशभरात अशा प्रकारच्या कार्यशाळा घेत आहे. टीटीआयने तंत्रज्ञानात प्रशिक्षित केलेले अंध बांधव मोठय़ा शहरातील कार्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी करीत असल्याचेही प्रशिक्षकांनी सांगितले.

मूजे’त स्थापन होणार इन्स्टिट्यूट
डिसेंबर 2012 मध्ये महाविद्यालयात दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ब्रेल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. दृष्टिहीनतेमुळे जे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आहेत, त्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा या उद्देशाने भविष्यात आखणी करण्यात आली आहे. मोबाइल टेक्नॉलॉजी वापर, संगणक तंत्रज्ञान व त्याद्वारे जगातील ग्रंथालयातील ग्रंथ कसे वापरावेत, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदींबाबत माहिती तसेच प्रशिक्षण देण्यासाठी मू.जे. महाविद्यालयात युजीसीच्या अनुदानातून अंध बांधवांसाठी इन्स्टिट्यूट सुरू होणार आहे. त्यासाठी मू.जे. महाविद्यालयाने दोन लाख रुपये खर्च करून देवनागरी ओसीआर आणि जॉस ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने अंध विद्यार्थ्यांसाठी प्रणाली सुरू केली आहे.

ओसीआर आणि जॉस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पुस्तकाची पाने स्कॅन करून त्याला व्हॉइस कन्व्हर्ट केल्यास पुस्तकाची पाने संगणक वाचून दाखवितो. अंध व्यक्ती वापर करू शकतील असे संगणक तयार केले आहेत. पुस्तके स्कॅन करण्यासाठी कॅमेराने फोटो इमेज तयार करण्यात येते. फोटो इमेज जॉस सॉफ्टवेअरमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर संगणक पुस्तक वाचून दाखविते. भविष्यात अंध बांधवांना इतर ट्रेनिंग देण्यासाठी अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. - नंदकुमार बेंडाळे, अध्यक्ष, केसीई