आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tender Issued Not Permission Of Technical , Administrative Yaval Muncipal Council

तांत्रिक, प्रशासकीय मान्यतेशिवाय यावल नगरपालिकेची निघाली कामाची निविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - रस्ता खडीकरणासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता न घेताच निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप नगरसेवक अतुल पाटील यांनी केला आहे. ही प्रक्रिया राबवणारे मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांविरुद्ध त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

यावल पालिकेच्या मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी नियमबाह्यपणे कामाच्या निविदेची जाहिरात प्रसिद्ध केली. आपल्या र्मजीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी नगराध्यक्षांना विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार भाजपचे नगरसेवक अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे केली आहे. शहरातील विस्तारित भागातील रस्ते खडीकरणासाठी सुमारे 70 लाख रुपये खर्चाच्या कामासाठी काढलेल्या निवेदतही गैरप्रकार झाल्याचा पाटील यांचा खळबळजनक आरोप आहे.

तक्रारीमध्ये स्थायी निर्देश क्रमांक 36 च्या अनुक्रमांक 9 नुसार सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच आणि पालिका अधिनियमाचे कलम 72 अन्वये प्रशासकीय मंजुरी घेतल्यानंतर निविदा मागवण्याची तरतूद आहे. या प्रक्रियेची पूर्तता न करताच मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे आणि बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.ए.शेख यांनी र्मजीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी नगराध्यक्षा माधुरी फेगडे यांना विश्वासात घेतले नाही. 26 मार्च रोजी वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध केली. प्राप्त झालेल्या निविदा 6 एप्रिलला उघडण्यात आल्या. मात्र, निविदाधारकांना प्रत्यक्ष बोलावण्यात आले नाही. हा सारा प्रकार संशयास्पद असल्याचा नगरसेवक पाटील यांचा दावा आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेवूनच मुख्याधिकार्‍यांनी निविदा मागवायला हव्यात. मात्र, या नियमांना यावल पालिकेने फाटा दिला. चुकीची प्रक्रिया राबवणार्‍यांवर कारवाई करून निविदा रद्द करावी, जाहिरातीवरील खर्च संबंधिताकडून वसूल करावा, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आलेली आहे. दरम्यान, यासंदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी सोनवणे यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, संपर्क होवू शकला नाही. एकूणच हा प्रकार शहरात दिवसभर चर्चेत होता.


माहिती दिलेली नाही
मुख्याधिकार्‍यांनी संबंधित कामाची जाहीर निविदा कधी प्रसिद्ध केली, याबाबत नगराध्यक्ष म्हणून आपल्याला काहीही माहिती दिलेली नाही. विस्तारित भागातील रस्त्यांच्या कामासाठी साधी चर्चाही झालेली नाही. मुख्याधिकार्‍यांनी मनर्मजी चालवली आहे. माधुरी फेगडे, नगराध्यक्ष, यावल


विशिष्ट ठेकेदार
मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे ते कार्यरत असलेल्या पालिकेतील कामे ठराविक ठेकेदारांना देतात. यापूर्वी त्यांच्या सेवाकाळात संबंधित ठिकाणी ज्या-ज्या ठेकेदारांना कामे मिळाली, तेच ठेकेदार यावलमध्ये कामे घेत आहेत. हे संशयास्पद आहे. अतुल पाटील, नगरसेवक, भाजप