आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिराच्या जागेवरून पिंप्राळा तापले,विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पिंप्राळ्यातील श्रीराम बालाजी संस्थानच्या राम मंदिरामधील पुजा-याच्या खोलीवरून मंगळवारी सकाळी तणाव निर्माण झाला होता. न्यायालयाच्या आदेशावरून पुजा-याच्या खोलीवर ताबा घेण्यासाठी तीन बेलिफ आणि विश्वस्त मंदिरात पोहोचताच गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर खोलीवर ताबा घेण्यास गावक-यांनी विरोध सुरू केला. तसेच संतप्त गावक-यांनी विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. तरुणांनी विश्वस्तांविरोधात रिक्षांतून रॅली काढल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तणावपूर्ण परिस्थितीमुळे पिंप्राळ्यात दंगल झाल्याचीही अफवा पसरली. अखेर न्यायालयाचे बेलिफ आणि विश्वस्त माघारी परत गेल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, मंदिराच्या पुजा-यातर्फे गावक-यांनी दुपारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

पुजारी श्यामसुंदरदास नरेशदास (वय ७०) यांची मंदिराच्या आवारातच राहण्याची खोली आहे. या खोलीवरून पुजारी आणि विश्वस्त यांच्यात वाद असून गेली १६ वर्षे न्यायालयीन लढाई सुरू होती. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने विश्वस्तांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर मार्च २०१५ रोजी ताबा मिळवण्यासाठी न्यायालयाने खोलीचा ताबा घेण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी तीन बेलिफ आणि विश्वस्त मंडळी राम मंदिरात पोहोचली. पुजा-याच्या खोलीवर ताबा मिळवण्यासाठी विश्वस्त आणि न्यायालयीन कर्मचारी आल्याचे वृत्त गावात वा-याच्या वेगाने पसरताच शेकडो गावक-यांनी मंदिराकडे धाव घेतली. याच दरम्यान विश्वस्तांनी मंदिराला कुलूप लावले. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले. विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. तसेच वयोवृद्ध पुजा-यास बाहेर काढण्यासाठी विश्वस्तांनी दमदाटी केल्याची अफवा पसरली. त्यानंतर सुमारे ५०० ते ६०० तरुणांनी गावातून जाेरदार घोषणाबाजी करीत रॅली काढली. तरुणांचा हा जत्था थेट न्यायालयाच्या दिशेने धावला.
श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीला उपस्थित गावकरी पुजारी.

१३ वर्षे न्यायालयीन लढाई
सन२००२ मध्ये पुजा-यांना मंदिराबाहेर काढता येणार नाही, असा निकाल दिवाणी न्यायालयाने दिला होता. विरोधात निकाल गेल्यानंतर विश्वस्तांनी त्याला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले. १३ वर्षे खटला चालल्यानंतर २४ फेब्रुवारी २०१५ मध्ये न्यायाधीश आर.के.पटणी यांच्या न्यायालयाने पुजारी श्यामसुंदरदास यांचा खोलीवर अधिकार नसल्याचा निर्वाळा दिला. मंदिरातील खोलीचा ताबा विश्वस्तांनी घ्यावा, असेही निकालात म्हटले होते. त्यानुसार दरखास्त हुकूमनामा बजावणीसाठी विश्वस्तांनी न्यायाधीश एस.एस.पाखले यांच्याकडे अर्ज केला. मार्च रोजी न्या. पाखले यांनी पुजा-यांच्या खोलीचा कब्जा घेण्याचे आदेश दिले. या खटल्यात पुजारी श्यामसुंदरदास यांच्यातर्फे अॅड.भरत देशमुख तर विश्वस्तांतर्फे अॅड.सुनील बागुल यांनी काम पाहिले.

पुजा-याला मारहाण; गावक-यांचा आरोप
दरम्यान,मंगळवारी सकाळी ट्रस्टींनी मंदिरात येऊन पुजारी शामसंुदरदास यांना मारहाण केली. जबरदस्तीने त्यांचे सामान बाहेर फेकून दिले असा आरोप गावक-यांनी केला आहे. विश्वस्तांनी केलेला प्रकार चुकीचा होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायलयात जाणार असल्याची माहिती गावक-यांनी दिली. गोकुळसिंग पाटील, पोपट चत्रु पाटील, भिका दौलत पाटील आदींच्या नेतृत्वात गावातील तरुणांनी विश्वस्तांच्या भूमिकेला विरोध केला.

संस्थेच्या नावावर सुमारे ५० एकर जागा
पिंप्राळयातीलया संस्थेच्या नावावर शहरात तसेच शहराला लागून चार ठिकाणी सुमारे ५० एकर जागा आहे. या जागांची सध्याची किंमत काही कोटींच्या घरात आहे. तर दुसरीकडे मंदिराची अवस्था मात्र खराब झाली आहे. मंदिरातील काही खोल्या जीर्ण झाल्या आहेत.त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची गरज असल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.

वादाचे कारण
संस्थानाचाकारभार आणि इतर व्यवहारांवर हक्क,अधिकार कुणाचा? यावरून हा वाद सुरू झाला. संस्थेच्या व्यवहारात पुजा-यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. जीर्णोद्धाराच्या कामातही अडथळे आणण्यास सुरुवात केल्याचा आरोप करून पुजा-यास मंदिरातून बाहेर काढण्यासाठी विश्वस्तांनी १९९९ मध्ये खटला दाखल केला.

अडीचशे वर्षे जुने मंदिर
पिंप्राळाभागातील हे राम मंदिर सुमारे २५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. श्रीराम बालाजी संस्थान मोहेश्वरी उर्फ बालाजी मंदिर संस्थान या मंदिराचा कारभार पाहते. या ठिकाणी गेल्या २५ वर्षांपासून श्यामसुंदरदास हे पुरोहिताचे काम पाहतात. त्यांना मासिक मानधन दिले जाते. मंदिराच्या आवारातच त्यांना राहण्यासाठी खोली दिली आहे. आवारात आणखीही काही रूम्स असून त्याही भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यातून मिळणा-या पैशांवर पुजा-याचा उदरनिर्वाह चालतो.

पिंप्राळ्यातील श्रीराम मंदिरातील पुजा-याच्या याच खाेलीवरून वादंग उठले आहे. ट्रस्टींनी महाराजांचे सामान रस्त्यावर फेकून दिले. त्यांना धक्काबुक्की केली, तसेच मंदिराला कुलूप लावले हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. मंदिराच्या जागांच्या उता-यांवर अजूनही महाराजांच्या वाड-वडीलांची नावे आहेत. गावकरी या घटनेचा निषेध करीत आहेत. राहुलराजपुत, गावकरी

जप्तीची कारवाई करण्यासाठी आलेल्या ट्रस्टींनी सामान बाहेर काढून टाकला. त्यानंतर हात पकडून मलाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गावकरी मंदिरात आल्यानंतर त्यांनी ही कार्यवाही थांबवली. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. श्यामसुंदरदास नरेशदास, पुजारी

पुजारी शामसुंदरदास यांना संस्थेने मानधनावर ठेवले होते. त्यांनी वेगवेगळ्या संस्थेचे व्यवहार, मालमत्तांवर हक्क सांगण्यास सुरूवात केली हाेत. त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागितली. आमच्या बाजूने निकाल मिळाल्यामुळे पुजा-यांची खोली ताब्यात घेण्यासाठी कायदेशीररीत्या कार्यवाही करीत होतो. नागरिकांनी गैरसमज करून कार्यवाही थांबवली. मंदिर सर्वांचेच आहे. प्रकाश जाखेटे, विश्वस्त