आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून होणार महागाईची जाणीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमुळे समाजावर होणार्‍या परिणामांचे धडे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यंदापासून अभ्यासक्रमात बदल झाला असून आता विद्यार्थ्यांना वर्तमानातील समस्यांचे भान राहावे, अशा प्रकारची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. महागाई बाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू असताना महागाई का वाढते, त्याची कारणे व परिणाम काय तसेच त्यावरील उपाययोजनासंबंधी सविस्तर माहिती सामाजिकशास्त्रे विषयात देण्यात आली आहे.

‘विद्यार्थिकेंद्रित शिक्षण’ या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक महामंडळाने दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. ही नवी रचना विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयोगी पडावी, याची काळजी घेण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धर्तीवरच अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

महामंडळाने जून 2013 पासून दहावीच्या गणित व विज्ञान वगळून मराठी, हिंदी, संस्कृत इंग्रजी व सामाजिकशास्त्रे विषयांच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. ज्ञानाच्या आधारे भविष्यातील जीवनमार्ग शोधण्याची क्षमता व आधुनिक काळातील समस्यांना सहजपणे सामोरे जाता यावे, हा अभ्यासक्रम बदलण्यामागचा उद्देश आहे.

100 गुणांचे सामाजिकशास्त्र
सामाजिकशास्त्र हा विषय पूर्वी इतिहास-भूगोल आणि नागरिकशास्त्र असा होता. तो आता दोन भागांत करण्यात आला आहे. पहिला भाग इतिहास व राज्यशास्त्र, दुसरा भाग भूगोल आणि अर्थशास्त्र. इतिहास व राज्यशास्त्र भागात राजकीय पक्षांची ओळख, लोकशाही, जागतिक ीकरण आदींचा समावेश आहे, तर भूगोल आणि अर्थशास्त्रात ग्राहक संरक्षण आणि जागतिकीकरणात बदलणारे आर्थिक चक्र, महागाई तसेच आजूबाजूचे पठारी प्रदेश हवामानावर होणारे परिणाम आदींचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी 150 गुणांचा असलेला हा अभ्यासक्रम आता 100 गुणांचा राहणार आहे.

असे आहेत बदल
उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर पुस्तकात ऐतिहासिक नवीन संकल्पना, जागतिकीकरण, महिलांचा सहभाग, पर्यावरणाची गरज, मानवतावाद, इतिहासविषयक बदललेली दृष्टी विचारात घेऊन अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. ज्ञान, रचनावाद आणि प्रात्यक्षिक पद्धतीवर भर देण्यात आला आहे.

सामान्यज्ञानात वाढ होण्यास मदत
विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्‍नांची जाणीव व्हावी या उद्देशाने बदल करण्यात आले आहेत. जुन्या अभ्यासक्रमात साम्राज्यवादाची नुसती व्याख्या होती. नव्या अभ्यासक्रमात सखोल विश्लेषण आहे. सर्व प्रकरणे सविस्तर मांडली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानात वाढ होऊन भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करताना याचा फायदा होईल. शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी