आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्त्व‘परीक्षा: शाळा सुरू होताच पहिल्या आठवड्यात चाचणी परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच आठवड्यात दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होईल, लवकरच याविषयीचे आदेश काढले जातील, अशी माहिती पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक नामदेव जरग यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

येत्या १५ जूनपासून शाळांना सुरुवात होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेची तयारी सुरू झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, सत्कार असला तरी त्यानंतर पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना परीक्षेलाही सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी दुसरी ते आठवीपर्यंत शिक्षण विभाग लेखी परीक्षा घेणार आहे.
हा उपक्रम विद्यार्थांना सुरूवातीला नाराजीचा वाटणार असला तरी, या उपक्रमामुळे मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाला उजाळणी मिळणार आहे. मुलांबरोबर शिक्षकांमध्येही अभ्यासाची उजळणी शक्य होईल.

गणित आणि भाषा विषयावर अधिक भर
सर्वजिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या या चाचणी परीक्षा लेखी स्वरुपाच्या असतील. यात विशेषत: गणित अाणि भाषा विषयावर अधिक भर असणार आहे. १०० गुणांचा हा पेपर असून यात वर्ग, विषय माध्यमनिहाय प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम किंवा परीक्षा घेण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेवर असणार अाहे. पहिली पायाभूत चाचणी परीक्षा १६ ते २० जूनपर्यंत घेण्याचेही नियोजन करण्यात येत आहे.

शिक्षकांची तयारी सुरू
शिक्षणविभागाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल. यासह मागील अभ्यासक्रमही कायम आठवणीत राहील. शिक्षकांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले असून अद्याप मात्र अध्यादेशाची प्रतीक्षा लागून आहे.
-राजेंद्र सपकाळे, प्रदेशाध्यक्ष, राज्य शिक्षण परिषद संघटना

नियाेजन शेवटच्या टप्प्यात
राज्यभरातील शाळा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यभरात पहिल्याच आठवड्यात एकाच वेळी हा उपक्रम राबवला जाणार आहे. याविषयीचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. परीक्षा पद्धती पार पाडूनही शाळांमधील गुणवत्तेबाबत वारंवार चर्चा होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी या प्रकारची परीक्षा घेण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू होणार असून तशा प्रकारची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासंबंधीचे आदेश अद्याप शासनाने काढले नसल्याचेही ते म्हणाले.

अशी असेल परीक्षा
वर्षभरात विद्यार्थ्यांना तीन चाचणी परीक्षा घ्याव्या लागतील. यात पहिली चाचणी पायाभूत असेल. यानंतर दोन चाचण्या या संपादणूक असतील, पहिली पायाभूत चाचणी परीक्षा शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच होणार आहे. ही परीक्षा मागील वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार असणार आहे. म्हणजे विद्यार्थी तिसरीत गेला असेल तर दुसरीतील अभ्यासक्रमावर ही परीक्षा होईल. दरम्यान शाळा सुरू झाल्यानंतर लगेच परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होण्याची भीती व्यक्त होत आहे. सुटी संपल्याने अचानक परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांपुढे हे आव्हान असणार आहे.