आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धन्यवाद! माझ्या पतीला निलंबित केल्याबद्दल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘धन्यवाद साहेब, माझ्या पतीला निलंबित केल्याबद्दल मी आपली आभारी आहे’, असे म्हणत अँड. उषा यादव यांनी गुरुवारी दुपारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना पुष्पगुच्छ दिला. पाणीपुरवठा विभागातील चीफ केमिस्ट विजय सुखदेव यादव यांच्या त्या पत्नी आहेत.

बुधवारी सायंकाळी आयुक्त कापडणीस यांनी चौघांना तडकाफडकी निलंबित केले. यात गैरहजेरीचा ठपका ठेवण्यात आलेले विजय यादव यांचाही समावेश आहे. स्वत: यादव यांनीही निलंबनाबाबत एक पत्र आयुक्तांना लिहिले असून तेही अँड. उषा यादव यांनी आयुक्तांना या वेळी दिले. त्यातही विजय यादव यांनी निलंबनाबद्दल आयुक्तांचे उपरोधिकपणे आभार मानले आहेत. यादव पती-पत्नीची ही गांधीगिरी आयुक्तांनी फारशी मनावर घेतली नसली तरी महापालिका कार्यालयात या प्रकाराची आज दिवसभर चर्चा होती.


विजय यादवांनी लिहिलेले पत्र
‘माननीय आयुक्त, तुम्ही मला निलंबित करून माझ्या प्रामाणिकपणा आणि कष्टाचा सन्मान केला आहे. हे एक उत्तम कार्य आपण केले असून मला पुन्हा कामावर घ्यावे यासाठी कोणी राजकीय दबाव आणला तरी माझे निलंबन आदेश रद्द करू नका. मी आपला अत्यंत आभारी आहे, धन्यवाद.’


न्यायालयात दाद मागणार
आयुक्तांनी प्रामाणिकपणे काम करणार्‍या माझ्या पतीवर अन्यायकारक कारवाई केली आहे. सुटीच्या दिवशीसुद्धा ते कामावर जातात. लोकांच्या सोयीसाठी ते सण असो की काही कार्यक्रम, घरी थांबतही नाहीत. ते जर महिन्यातून दोनच दिवस कामावर जात होते तर शहराला शुद्ध पाणीपुरवठा कसा काय होतो आहे? यामुळे काम करणार्‍यांची नीतिमत्ता खच्च्ी होते. त्यामुळे या अन्यायकारक कारवाईविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. एक मात्र खरं की, या कारवाईमुळे माझे पती किमान परिवाराला वेळ तरी देऊ शकतील. अँड.उषा विजय यादव


योग्य कारण असल्यानेच संबंधितांवर केली कारवाई
मी मंगळवारी सायंकाळी पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा केलेल्या तपासणीत तिथे अनेक बाबतीत अनियमितता आढळून आली आहे. निलंबनासाठी योग्य कारणे असल्यानेच संबंधितांवर ती कारवाई करण्यात आली. निलंबन ही शिक्षा नसून चौकशीत अडचणी येऊ नयेत म्हणून केलेली कार्यवाही आहे. प्रशासकीय कामकाजातला हा भाग आहे. यादव यांच्याविरुद्ध लवकरच सविस्तर दोषारोपपत्र ठेवले जाईल. त्यांच्या पत्नीने दिलेले निवेदन अजून वाचलेले नाही. त्यामुळे त्या संदर्भात बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. संजय कापडणीस, आयुक्त