आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेडियममधील रस्ता बंदची तयारी; काॅलन्यांचा वापर संकटात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अाक्रमक झालेल्या क्रीडा विभागाने स्टेडियमवर बंधने अाणायला सुरुवात केली अाहे. गेटवर अणकुचीदार पत्रा बसवून खेळाडूंची काेंडी केल्यानंतर अाता या स्टेडियममधून जाणारा रस्ताच बंद करण्याची तयारी क्रीडा विभागाने चालविली अाहे. त्यामुळे देवपूर परिसरातील तब्बल दीडशे काॅलन्यांचा वापर संकटात सापडणार अाहे. सध्या वापरात असलेला रस्ता क्रीडा संकुलातील व्यावसायिकांच्या पार्किंगचा भाग अाहे. त्यामुळे ताे कधीतरी बंद करावाच लागेल, असे क्रीडा विभागाचे मत असल्याचे शनिवारी जाणवून अाले.
जिल्हा क्रीडा संकुल बांधताना झालेल्या चुकांचा भुर्दंड अाता नागरिकांना सहन करावा लागणार अाहे. दाेन भागात विभागलेले शहरातील क्रीडा संकुल हे देशातील एकमेव उदाहरण असल्याचे शहरातील वास्तुतज्ज्ञ सांगतात. मुळात स्टेडियममधून रस्ता तयार करण्यात अाला. गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्यावरून रहदारी सुरू अाहे. मात्र, काेणत्याही जिल्हाधिकाऱ्याने या रस्त्याची नीटपणे विचारपूस केली नाही. मुळात हा रस्ता एनसीसी भवनाच्या मागून जाणार हाेता. त्यामुळे स्टेडियम एकसंघ राहिले असते. मात्र तसे झाले नाही. अाता देवपूर परिसरातील काॅलनीवासीयांसाठी हा रस्ता डाेकेदुखी ठरणार अाहे. या संकुलाच्या मध्यातूनच रस्ता जात असल्यामुळे मैदानाच्या विकासाला काहीसे अडथळे निर्माण होत असतात. त्यात प्रामुख्याने पार्किंगचा विषय आहे. क्रीडा संकुलाच्या मालकीच्या जागेतून हा रस्ता जात असल्यामुळे क्रीडा समिती हा रस्ताच बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे. संकुलाच्या मालकीच्या जागेतून जाणारा हा रस्ता सध्या रहदारीसाठी वापरण्यात येत आहे. हा रस्ता वलवाडी हद्दीतील शंभर ते दीडशे कॉलन्यांमध्ये ये-जासाठी वापरण्यात येत असतो. स्पर्धांच्या कालावधीत मैदानात होणाऱ्या गर्दीच्या वेळेस या ठिकाणी लहानमोठे अपघातही होत असतात. रस्ता बंद करण्याचा क्रीडा प्रशासन विचार करीत आहे. दरम्यान रस्ता बंद केल्यानंतर या ठिकाणी स्केटिंग रिंग विकसित करण्यात येणार आहे.

स्केटिंग रिंगसाठी खटाटाेप
क्रीडा संकुलाच्या परिसरात रस्ता बंद करण्याचा डेमाे जणू शनिवारी झाला. क्रीडा विभागाने मुख्य गेट वगळता इतर दाेन्ही गेट बंद केले. त्यावर कहर म्हणजे एका गेटवर तर अणकुचीदार पत्रा बसविण्यात अाला. त्यामुळे खेळाडूंना मुख्य गेटनेच वापर करावा लागला. अाेपन जिममध्ये जातानाही अनेकांना इकडून तिकडे जाण्याची वेळ अाली. भरीस भर म्हणजे स्टेडियममधून जाणाऱ्या रस्त्यावर माेठ्या प्रमाणात वाहने लागल्याने पार्किंगचाही खेळखंडाेबा झाला. मुळात स्केटिंग रिंग वाढवण्यासाठी हा खटाटाेप सुरू असल्याचे काही खेळाडूंनी सांगितले. त्यामुळे मैदानावर जाणाऱ्यांची मात्र दिवसभर काेंडी हाेत हाेती, असेही अाढळून अाले.

दुर्लक्ष केल्यामुळे रस्ता झाला सार्वजनिक
संकुलाची उभारणी करताना रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले.सुरुवातीला काही तज्ज्ञांनी एनसीसी कार्यालयाला लागूनच रस्ता सुचवला होता. मात्र, वलवाडी रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढण्यास अडचणी असल्यामुळे याकडे दुर्लक्ष करून सध्या वापरात असलेल्या रस्त्याचा निर्णय घेण्यात आला. अाता त्यावरही गंडांतर येणार अाहे. क्रीडा विभागासह या संकुलाचे अध्यक्ष असलेल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसते.

हा ठरू शकताे पर्याय
संकुलाच्या मध्यातून रस्ता जात आहे. हा रस्ता बंद झाल्यानंतर रहदारीसाठी संकुलाच्या पूर्वेला इंद्रप्रस्थ कॉलनीतून जाणाऱ्या एका रस्त्यावरून वापर वाढू शकणार आहे. तसेच अन्य दुसरा मार्ग सरळ वाडीभोकर गावातूनच आहे. मात्र हे दोन्ही मार्ग वाहनधारकांना मोठा फेरा घडविणारे आहेत. त्यात इंद्रप्रस्थ कॉलनीतून मोठी वाहने जाण्यास अडथळे आहेत. हा एकमेव रस्ता साेडला तर इतर पर्यायी रस्ते सध्यातरी या भागात नाही. त्यामुळे बिजलीनगर तसेच गाेंदूर राेडवरील शनि मंदिराकडील जानकीनगरमधून बाहेर निघणाऱ्या रस्त्यांचा वापर हाेऊ शकताे. हा भागही काॅलनी परिसरात अाहे. माेठ्या वाहनांची काेंडीच हाेईल, असे सगळ्या रस्त्यांचा अाढाव्यानंतर दिसते.

बातम्या आणखी आहेत...