आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तास मुसळधार पाऊस; पांंझरेला पूर, रस्तेही जलमय, खड्ड्यांमुळे दैना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - परतीच्या पावसाने मंगळवारी शहरात जाेरदार हजेरी लावली. तीन तास मुसळधार पाऊस सुरू हाेता. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. शहरातून वाहणाऱ्या सर्व नाल्यांमधून जाेरदार प्रवाह वाहताना दिसला. सखल भागात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले. त्यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करणे कठीण झाले. सकाळपासून पावसाने उसंत घेत हजेरी द्यायला सुरुवात केल्याने शहरातील वीजपुरवठाही पाच तास खंडित हाेता. पावसाने महापालिकेच्या ठेकेदारांनी केलेल्या तात्पुरत्या कामांवर पाणी फिरविले. सगळ्याच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली. त्यातून वाहन चालवण्याची कसरत करणेही अवघड झाले अाहे.
शहरात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जाेरदार पाऊस येईल, अशी लक्षणे दिसत हाेती. सकाळी सात ते अाठ वाजेच्या सुमारास काळाेखासारखे वातावरण तयार झाले. त्यानंतर नऊ वाजेच्या सुमारास देवपूर परिसरात पावसाला सुरुवात झाली. त्या वेळी साक्री राेड परिसरात पाऊस नव्हता. हा पाऊस पुरेसा जाेरदार नव्हता. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी दिली. ११ वाजेपर्यंत पाऊस सुरू हाेता. त्यानंतर विश्रांती घेत पावसाने १२ वाजता जाेरदार हजेरी दिली. शहरात पहिल्यांदाच तीन तास मुसळधार पाऊस झाला. दुपारी वाजेपर्यंत हा पाऊस सुरू हाेता. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले. गल्ल्यांमधून पाणी वाहत होते. यात पारोळा रस्त्यावर चौफुलीकडून महापालिकेकडे येणाऱ्या मार्गावर पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून वाहनधारकांना मार्ग काढावा लागत होता.

नाल्यांमध्येही जाेरदार प्रवाह
शहरातील सगळेच नाले मंगळवारच्या जाेरदार पावसाने प्रवाहित झाले. रस्त्यावर मोकळ्या मैदानात पाणी साचलेले असताना नाल्यांनाही काठाेकाठ पाणी अालेे. शहरात सुशी नाला, माेती नाला, हगऱ्या नाला हे मध्य भागातून वाहतात. पावसाचा जोर वाढला असता तर नाल्याच्या आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण हाेण्याची शक्यता हाेती.

नागरिकांची उडाली त्रेधा
शहरात पावसाला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. त्यानंतर थोडा वेळ पाऊस कमी झाला. मात्र दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शाळेतून घरी जाणारे विद्यार्थी नागरिकांची एकच धावपळ उडाली. आग्रा रोडवरील फेरीवाला व्यावसायिकांची धावपळ झाली. दुकानाचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. तर रस्त्यावरील वाहतूकही काही वेळ थांबली होती.

पांझरेत साडेचार हजार क्युसेस पाणी
शहराच्या मध्यवर्ती भागातून पांझरा नदी वाहते. या वेळी पावसाळ्यात पांझरा नदी वाहिलीच नव्हती. मात्र, साक्री तालुक्यात उगमाच्या क्षेत्रात पाऊस झाल्याने पांझरा नदीला पूर आला होता. आताही दोन दिवसापासून पाऊस होत असून, सध्या अक्कलपाडा धरणातून पांझरेत साडेचार हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
बातम्या आणखी आहेत...