आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांना पगारासाठी आंदोलन करणे भोवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-थकित पगारासह दर महिन्याला 10 तारखेच्या आत पगार मिळण्यासाठी कर्मचार्‍यांनी सोमवारी प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केले. याच वेळी प्रशासनातर्फे सतरामजली इमारतीतील विविध विभागांची झाडाझडती घेण्यात आली. या वेळी जागेवर आढळून न आलेल्या 34 कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार कापण्याचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या कारवाईमुळे आंदोलकांना आर्थिक फटका बसला आहे.
पालिका कर्मचार्‍यांचा डिसेंबर महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. आयुक्त आल्यापासून पगार होत नसल्याचा ठपका कर्मचारी संघटनेतर्फे ठेवण्यात आला आहे. तसेच गुरुवारी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारपासून ‘काम बंद’ आंदोलनाचा इशाराही कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्षात ‘काम बंद’ केले नसले तरी, सोमवारी सकाळी 10.30 ते सुमारे 3 वाजेपर्यंत कर्मचार्‍यांनी सतरामजली इमारतीच्या प्रांगणात धरणे आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी लिफ्टजवळील मुख्य प्रवेशद्वार बंद करून ठेवले होते. त्यामुळे नंतर आलेल्यांना आत जाता येत नव्हते किंवा मधल्या कर्मचार्‍यांना बाहेर येता येत नव्हते. तसेच यादरम्यान आस्थापना अधीक्षक डी.आर.पाटील व कार्यालय अधीक्षक गोपालसिंग राजपूत यांनी कर्मचारी तपासणीचे सत्र सुरू केले असता, 34 कर्मचारी जागेवर आढळून आले नाहीत. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
कारवाई मागे घेण्याबाबत आज निर्णय
पगारकपातीची बाब माहीत पडल्यावर संघटनेचे पदाधिकारी व काही कर्मचारी ही कारवाई मागे घेण्यासाठी विनंती करत होते; मात्र यासंदर्भात मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांनी संबंधितांना सांगितले.