आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्यांच्या मृत्यूचे गूढ कायम; ‘लाल फिती’त अडकला तपास; वन्यप्राण्यांवर शिकाऱ्यांचा डाेळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघूर धरणाच्या परिसरात आढळून आलेले मृत बिबट्याचे पिलू. - Divya Marathi
वाघूर धरणाच्या परिसरात आढळून आलेले मृत बिबट्याचे पिलू.
जळगाव- शहरासह जिल्ह्यात गेल्या दाेन महिन्यांत वेगवेगळ्या घटनांमध्ये दाेन बिबट्यांचा मृत्यू झाला अाहे; परंतु अद्याप एकाही घटनेचा तपास लागलेला नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या चांगली आहे. या वन्यप्राण्यांना संरक्षण देण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवली तर निश्चितच शिकाऱ्यांवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा वन्यप्रेमींनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली अाहे. 
 
तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने वाढलेल्या उष्णतेचा माणसांसह वन्यप्राण्यांना माेठा त्रास हाेत अाहे. जंगलांतील तृणभक्षी प्राणी कमी झाल्यामुळे बिबट्यांना सहज अन्न उपलब्ध होत नाही. त्यामुळे जंगलांना लागून असलेले शेत, गावांमध्ये ते थेट प्रवेश करीत आहेत. १२ जून २०१६ रोजी रवंजा (ता. एरंडाेल) येथे शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकल्यामुळे तीन ते चार वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला हाेता. हे जाळे शेतीचे नुकसान करणाऱ्या जंगली डुकरांसाठी लावल्याचे त्या वेळी सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र बिबट्या जाळ्यात अडकल्यानंतर शेकडो लाेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यामुळे बिबट्याने सुटका करून घेण्यासाठी जीवाचा आकांत केला. काहींनी हातात काठ्या घेऊन त्याच्या दिशेने भिरकावल्या होत्या. पोलिस तसेच वनविभागाच्या तपासात तसे समोरही आले होते; पण पुढे या घटनेचा तपास केला नाही.
 
बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण अद्यापही ‘लाल फिती’तच अडकून आहे. या बिबट्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन केले होते. त्यामुळे तपासकाम सोपे होणार हाेते. मात्र, तसे झाले नाही. ११ महिने उलटल्यानंतरही तपास लागला नाही. वाघूर धरण परिसरात एका मादी दोन बछडे दोन महिन्यांपूर्वी आढले होते. त्यानंतर २६ एप्रिल रोजी यातील एक बछडा मृतावस्थेत आढळून आला. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वाघूर परिसरातील वनसंपदाकडे दुर्लक्ष होत असल्याचे हे एक उदाहरण आहे. या भागात मानवी हस्तक्षेप वाढला असून, शिकारीदेखील फिरत असतात. त्यामुळे वनविभागने गस्त वाढवणे गरजेचे आहे. 
 
या भागांमध्ये वावर 
रायपूर-कुसुंबा, वाघूर धरण परिसर, आव्हाणे या भागात बिबट्यांचा वावर आहे. १४ एप्रिल २०१७ रोजी रायपूर येथे दुरसिंग कन्हैया बारेला या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजीच आहे. गेल्या वर्षी आव्हाणे शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यात सात ते आठ बिबटे असल्याचा अंदाज आहे. 
 
दहा दिवसांत अहवाल येईल 
-रवंजा येथे मृत्यू झालेल्या बिबट्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल नाशिक येथून आठ-दहा दिवसांत प्राप्त होणार आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल. बी.एस.पाटील,आरएफओ, रवंजा-पद‌्मालय 
 
गस्त वाढवण्याची गरज 
-जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या चांगली आहे. आहे त्या वन्यप्राण्यांना संरक्षण देण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी गस्त घातल्या पाहिजेत. त्यामुळे शिकाऱ्यांवर वचक निर्माण होईल. वासुदेव वाढे, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था 
बातम्या आणखी आहेत...