आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन एमआयडीसी; २५० ते ३०० एकर जागेचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे उद्योग उभारणीसाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यातील एमआयडीसींमध्ये नवीन उद्योगांसाठी जागा शिल्लक नाही. खासगी जागा विकत घेऊन उद्योग उभारणीचा पर्याय खर्चिक आहे. ही बाब नवीन उद्योजकांच्या आवाक्याबाहेर आहे. हे लक्षात घेऊन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी अडीचशे ते तीनशे एकर जागा खरेदीचे प्रस्ताव उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांनी मागवले आहेत, अशी माहिती उद्योग सहसंचालक डी.एस.जोशी यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधताना दिली.
उद्योजकांच्या अडचणी, नोंदणीप्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्योग सहसंचालक जोशी बुधवारी जळगावात आले होते. यानिमित्ताने त्यांनी एमआयडीसीने घेतलेल्या धाेरणांची माहिती दिली. ते म्हणाले की, मेक इन इंडिया अंतर्गत उद्योग उभारणीसाठी नवीन उद्योजक पुढे येत आहेत. शासनानेही उद्योग उभारणीसाठी अनेक सोयीसवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्योजकांचा त्रास वाचावा, एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी मैत्री कक्षाची स्थापना केली आहे. राज्यात अधिकाधिक उद्योेग यावेत. उद्योजकीय संस्कृती रुजावी, असाही यामागे शासनाचा उद्देश असल्याचे सांगितले.

नवीन उद्योगांसाठी खासगी, पीपीचा पर्याय : राज्यातउद्योगधंद्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भूखंडाची मागणी वाढत आहे. यासाठी अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे लक्षात घेऊन नवीन उद्योगांना भूखंड देण्यासाठी अडीचशे ते तीनशे एकर जागा खरेदीचे प्रस्तावित आहे. यासाठी तीन पर्याय समोर आहेत. पहिला पर्याय म्हणून एमआयडीसी स्वत: जमीन खरेदी करून नवीन औद्योगिक वसाहत स्थापना, दुसरा पर्याय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि तिसरा पर्याय संपूर्ण खासगी त्यामध्ये एमआयडीसीचा हिस्सा देण्याचा आहे. या तिन्ही मॉडेलबाबतचा प्रस्ताव प्रधान सचिवांनी मागवला आहे. प्रायोगिक तत्त्वावर भिवंडीमध्ये खासगी उद्योजकांनी नवीन औद्योगिक वसाहत तयार केल्याचेही जोशी यांनी सांगितले.

जळगाव एमआयडीसीत १५९४ भूखंड वाटप
^जळगाव एमआयडीसीतील सर्व १५९४ भूखंड वाटप झाले आहेत. यापैकी काही भूखंड वापराविना पडून आहेत. भूखंड शिल्लक नसल्याने नवीन उद्योजकांना भूखंड मिळणे दुरापास्त झाले आहे. जळगाव एमआयडीसीत १५४ खुले भूखंड अाहेत. या भूखंडांना औद्योगिक स्वरूपात रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला उद्योजकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एस.एम.वैजापूरकर,क्षेत्रीय व्यवस्थापक, एमआयडीसी
बातम्या आणखी आहेत...