आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वादोन लाखांचे सोने चार तासांत मिळाले परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सोन्याला आकार देणार्‍या बंगाली कारागिराकडून सव्वादोन लाख रुपयांचे सोने बुधवारी दुपारी १२ वाजता सराफ बाजारात हरवले हाेते. दरम्यान, याबाबत पोलिसांनी तपासचक्रे फिरवून चार तासांत हे सोने संबंधित कारागिराला मिळवून दिले आहे.

मारुती पेठ भागातील बंगाली कारागीर बापन आराधन जाना यांच्याकडे काम करणारा गणेश दलई हा ८४ ग्रॅम वजनाचे तापवलेले सोने घेऊन दुसर्‍या दुकानात जात हाेता. सीताराम कॉम्प्लेक्सजवळ त्याच्या खिशातून सोने ठेवलेली प्लास्टिकची पिशवी खाली पडली. ही पिशवी मागून येणार्‍या एका दुचाकीचालकाने उचलून घेतली होती. त्यानंतर काही वेळाने खिशातील पिशवी गहाळ झाल्याचे गणेशच्या लक्षात आले त्याने याबाबत मालकाला सांगितले. त्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी गणेशसोबत जाऊन तो ज्या रस्त्याने गेला तेथील माहिती घेतली.

बाजारातील काही व्यापारी कारागिरांना विचारणा केल्यानंतर गणेशच्या मागून दुचाकीवर येणार्‍या एका युवकाने काहीतरी उचलले असल्याचा क्लू मिळाला. तसेच काही जणांनी त्या युवकाच्या दुचाकीचा क्रमांकही सांगितला. त्यावरून पोलिसांनी तपास करून दुपारी वाजता ती पिशवी उचलून घेऊन गेलेल्या युवकाला शोधून काढले. त्याची चौकशी केली असता, त्याने मला सोने सापडले असल्याचे सांगत ते पोलिसांकडे दिले. सायंकाळी पोलिसांनी संबंिधत कारागीर कर्मचार्‍याला सोने दिले.

...अन्् दलई भांबावला
मालकाकडूनसोने घेऊन दुसर्‍या दुकानावर पोहाेचवण्यासाठी नेणारा गणेश दलई या घटनेमुळे भांबावला होता. ताे हे सोने परत देऊ शकला नसता, तर त्याला मालकाकडे तीन वर्षे विनापगारी काम करावे लागले असते. सुदैवाने सायंकाळी पोलिसांकडून सोने परत मिळाले त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. प्रामाणिकपणे काम करत असतानाही हा प्रकार घडल्यामुळे तो हताश झाला होता. पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी त्याला धीर दिला. तसेच पुढच्या वेळी सोन्याची ने-आण करताना योग्य ती दक्षता घेण्याची सूचनाही केली.