जळगाव- मनपाचे विराेधीपक्ष नेते वामनराव खडके शब्दाचे पक्के अाहे. निस्वार्थ वृत्तीमुळेच त्यांचे राजकीय अाणि सामाजिक जीवन यशस्वी झाले अाहे. वामनरावांसारखे राजकीय अायुष्य जगले तर खासदार ए. टी. पाटील यांना दिल्लीत मंत्रीपद मिळू शकते, अशा शब्दात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खासदार ए. टी. पाटलांची फिरकी घेतली. तसेच वामनरावांना भलेही राज्यपाल करू नका, प्रमाेशन देऊ नका; परंतु, त्यांचा अडवाणी तरी करू नका, अशी विनंती डाॅ. उल्हास पाटील यांना अापल्याकडे केल्याचे खडसे यांनी जाहीरपणे सांगितले.
वामनराव खडके अमृत महाेत्सव सत्कार समिती नाथ फांऊडेशनतर्फे रविवारी लेवा भवन येेथे वामनराव खडके यांच्या सत्कार करण्यात अाला. अध्यक्षस्थानी अामदार एकनाथ खडसे हे हाेते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसे, रमेश पाटील, अामदार सुरेश भाेळे, अामदार हरिभाऊ जावळे, माजी खासदार डाॅ. गुणवंतराव सराेदे, माजी अामदार डाॅ. गुरूमुख जगवाणी, डाॅ. उल्हास पाटील, डाॅ. राजेंद्र फडके, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. राेहिणी खडसे, गजानन जाेशी, महापाैर नितीन लढ्ढा, भालचंद्र पाटील उपस्थित हाेते. या वेळी वामनरावांची वही तुला करत गाैरव करण्यात अाला. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले.
वामनराव खडके यांना पक्षाने विधानसभा किंवा अन्य ठिकाणी प्रमाेशन देण्याची मागणी महापाैर लढ्ढा यांनी केली. डाॅ. उल्हास पाटील यांनी वामनराव हे मूळचे काॅंग्रेसवासी असल्याचे सांगत त्यांनी हवे तर पुन्हा स्वगृही यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ए. टी. पाटील, सुरेश भाेळेंच्या विजयातून वामनरावांना वजा केले तर जळगाव शहरात दाेघांचेही राजकारण अल्पमतांमध्ये राहिले असते, असा चिमटा डाॅ. पाटील यांनी काढला. लाेकांना काॅंग्रेसवर भरवसा नसल्याने अाता डाॅ. उल्हास पाटील यांनाच भाजपमध्ये येण्याची वेळ अाल्याचा चिमटा गिरीश महाजन यांनी काढला. १९८२मध्येच विधानसभेची अालेली संधी वामनरावांनी नाकारल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. निखिल खडसे यांच्या निवडणुकीत अनेक जवळचे लाेक विकले गेले; परंतु, खडके माझ्यासाठी शब्दाचे पक्के राहिल्याची अाठवण खडसे यांनी सांगितली.