आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभागांमध्ये अस्वच्छता, आरोग्याचा प्रश्न जटील, ठेकेदार पद्धतीनंतरही स्वच्छतेवर परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्या आरोग्य विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण शहराची स्वच्छता होणे शक्य नसल्याने काही ठिकाणी प्रभागनिहाय सफाईचे ठेके देण्यात आले आहेत. हे ठेके देताना कर्मचारी संख्या ठरवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे एकमुस्त(ठेकेदाराला आवश्यक तेवढे)पद्धत डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदारामार्फत पुरेशी सफाई होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.
पालिकेच्या आरोग्य विभागात सुमारे ५०० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. ६८ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या स्वच्छतेसाठी हे मनुष्यबळ पुरेसे नसल्याने १३ प्रभागांत स्वच्छतेचा मक्ता देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यापैकी ५, २६, ११, १७, १९, २७, २९, ३६, ३७ अशा नऊ प्रभागांमधील सफाईचा ठेका देण्यात आला आहे. ठेका देताना संबंधित मक्तेदाराने प्रभागातील स्वच्छतेसाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यासह कचरा उचलून घेणे अपेक्षित आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा आकडा किती असावा? यासंदर्भात कोणतीही अट टाकण्यात आलेली नाही.
एकमुस्त पद्धतीने ठेका देण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक मक्तेदाराला दरमहा तीन लाख ४० हजार रुपये दिले जाणार होते. मात्र, आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे होऊ लागले असून, मक्तेदाराला वेळेवर पैसे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मक्तेदाराने कमीतकमी कर्मचारी संख्येत काम करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम त्या प्रभागातील स्वच्छतेवर होऊ लागला आहे.

यासंदर्भात प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी सांगितले की, मक्तेदारांच्या हद्दीत कचरा आढळून आल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाईचे अधिकार आरोग्य निरीक्षकांना आहेत.
निविदेतील नियमांकडे दुर्लक्ष
एक मुस्तमक्त्यात काही ठिकाणी कर्मचारी संख्या दिलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात तेवढे कर्मचारी कार्यरत नसतात. वॉर्डातील लोखंडी कचराकुंड्या उचलून खाली करण्याची जबाबदारी मक्तेदारांची आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराकडे तशी यंत्रणा नाही. त्यामुळे बाहेरून ओढता येईल तेवढा कचरा काढण्यात येतो. त्यानंतर उर्वरित कचराकुंडीतच पेटवून दिला जातो. निविदा प्रक्रियेतील करारानुसार प्रभागातून संकलित होणारा कचरा मक्तेदाराने हंजीर बायोटेक परिसरात टाकणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात तसे होत नाही.
शहरातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागातही स्वच्छतेच्या तक्रारी वाढल्या आहेत. पालिकेच्या काही नगरसेवक मंडळींनी कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या नावावर स्वच्छतेचे मक्ते घेतले आहेत. त्यामुळे नागरिकांची ओरड झाली तरी त्यांचा आवाज सभागृहापर्यंत पोहोचत नाही.
- नगरसेवकांचे नातलग, कार्यकर्तेच मक्तेदार
बातम्या आणखी आहेत...