आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकट्यानेच फोडली होती एका रात्रीत 10 दुकाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नवीन बीजे मार्केटमध्ये 9 डिसेंबरच्या रात्री 10 दुकानांचे शटरचे कुलूप तोडून दुकानांमधून चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी शहर आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचार्‍यांनी दीपक मगन पाटील या चोरट्याला ताब्यात घेतले. त्याने एकट्यानेच गुन्हा केल्याची कबुली देत चोरी केलेल्या रकमेपैकी 10 हजार रुपये आणि चोरी करण्यासाठी वापरलेली लोखंडी टामी पोलिसांच्या ताब्यात दिली.

चोरट्यांने 9 डिसेंबरच्या रात्री मार्केटमधील 10 दुकानांचे कुलूप तोडून चोरी केली. यातील मोराणकर एंटरप्रायझेस या दुकानातून 88 हजार रोख आणि 2 लाख रुपयांच्या औषधी, शिल्पसेवा आर्किटेर आणि न्यू डायमंड रियल इस्टेट या दुकानातून प्रत्येकी 10 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. तर जनवाणी नागरिक सहकारी पतपेढी, व्हेलोसिटी एंटरप्रायझेस, मातोश्री इलेक्ट्रिक, अशोक केमिकल्स, विजय डिस्ट्रिब्युटर्स, हबरेसेट रेमिडीस, वरूण एंटरप्रायझेस या दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. मात्र, पैसे किंवा वस्तू चोरीला गेल्या नव्हत्या. या प्रकरणी राजेंद्र मोराणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापूर्वीही भोगली शिक्षा
संशयित दीपक यावर आधी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो काही महिने तुरुंगात शिक्षा भोगून आला आहे. त्यानंतरही त्याने चोरी करणे सुरूच ठेवले. दीपकला आधी शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने एका वेगळ्या गुन्ह्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. मात्र, त्याचा त्या गुन्ह्यात सहभाग नसल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. त्याने जिल्हापेठ पोलिसांकडे नवीन बीजे मार्केटमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे 10 दुकाने त्याने एकट्यानेच फोडल्याचे पोलिसांना सांगितले.