आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी गृहमंत्र्यांसह झांबडांच्या घरात चोरी करणारा जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील गणपतीनगरासह राज्यभरातील नऊ जिल्ह्यांमध्ये घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार सैयद सिकंदर सैयद अख्तर (रा.बीड) याला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याला औरंगाबाद येथून अटक केली.
विशेष म्हणजे सिकंदरने 18 वर्षांत राज्यभरात सुमारे 40 छोट्या- मोठ्या चो-या केल्या आहेत. 2004मध्ये त्याने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या लातूर येथील बंगल्यात चोरी केली होती; पण या प्रकरणात तो स्वत: पोलिसांना शरण आला होता.

गणपतीनगरात दिलीप झांबड यांच्या बंगल्यात 29 जून रोजी घरफोडी करणारा सैयद सिकंदर सैयद अख्तर (वय 32, रा.बिड) यास मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. सिकंदरने झांबड यांच्या घरातून 10 लाख 78 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी 15 दिवसांपूर्वी नगर पोलिसांनी बबलू रहेमान शेख (रा.नगर) आणि सैयद सिराज सैयद लियाकत (रा.बीड) या दोघांना अटक केली होती. या तिघांनी मिळून झांबड यांच्या घरी चोरी केल्याचे सिकंदरने पोलिसांना सांगितले. दरम्यान, बबलू आणि सैयद सिराज यांना अटक झाल्यापासून सिकंदर जळगाव, बीड, औरंगाबाद आणि नगर अशा चार जिल्ह्यांच्या पोलिसांना चकवा देत होता. अखेर मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश देशमुख, संजय हिवरकर, रवि नरवाडे, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र पाटील आणि अर्जुन सुरवाडे यांच्या पथकाने औरंगाबाद येथे सिकंदरचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

सिकंदर पॉश बंगल्यात करत होता चोरी
पोलिसांनी सिकंदरला अटक केल्यानंतर त्याने 18 वर्षांपासून चोरी करत असून आतापर्यंत वेगवेगळया शहरात सुमारे 40 ठिकाणी चोरी केल्याची माहिती दिली. लातूर, यवतमाळ, जळगाव, वर्धा, नांदेड, जालना आणि परभणी या शहरांमध्ये त्याने अधिक घरफोड्या केल्या आहेत. फक्त पॉश बंगल्यांमध्येच चोरी करण्याची त्याला सवय आहे. सर्वात जवळचा साथीदार अशफाक हा सध्या जेलमध्ये असल्यामुळे बबलू आणि सैयद सिराज सोबत तो सध्या चोरी करत होता. बीड पोलिसांनी अटक केल्यानंतर आठ महिन्यांपूर्वीच त्याने हाय कोर्टातून जामीन मिळवला होता. जामीन मिळाल्यानंतर थेट जळगावात चोरी केल्याचे त्याने सांगितले.
पहिल्या दिवशी प्रयत्न, दुस-या दिवशी घरफोडी
झांबड यांच्या घरी चोरी करण्याच्या एक दिवस आधी सिकंदर व त्याचे दोन्ही साथीदार बीड येथून जमीरच्या चारचाकीतून जळगावात चोरी करण्यासाठी आले होते. त्यांनी आदर्शनगरातील एका घरात प्रवेश केला, मात्र तेथे काहीही मिळून न आल्यामुळे ते माघारी फिरले होते. दुस-या दिवशी ते पुन्हा परत जळगावात आले होते. त्यादिवशी त्यांनी झांबड यांच्या बंगल्यात चोरी केली होती.
बीडकडे जाताना सिकंदरला पोलिसांनी पकडले
जळगाव पोलिसांनी 11 दिवस मुक्कामात सिकंदरचा औरंगाबाद, बीड व नगर येथे शोध घेतला होता. मंगळवारी दुपारी तो दुचाकीने औरंगाबादहून बीडकडे जात असल्याची माहिती दुचाकी क्रमांकासह खब-याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दुपारी तो दुचाकीवरून जात असताना त्याला फोन आल्यामुळे त्याने गाडी थांबवली अन् त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. जळगाव पासिंगची गाडी न वापरल्यामुळेच आपण सापडल्याचे सिकंदरने सांगितले.

परिवारासोबत ईद साजरी
18 वर्षांत वेगवेगळ्या गुन्ह्यात सतत जेलमध्ये राहिलेल्या सिकंदरने यंदा पहिल्यांदाच परिवारासोबत ईद साजरी केली. त्यामुळे तो खूप आनंदी झाला असून त्याला आता अटकेचे काही एक वाईट वाटत नाही. सिकंदरचे दोन लग्न झाले आहे.