आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी : न्यायालयातून पळालेला चोरटा सापडला गच्चीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केलेला योगेश उर्फ रिंकू शिवाजी पाटील (वय 23, गोराडखेडा, ता.पाचोरा) याने बुधवारी दुपारी न्यायालयातून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढला होता. न्यायालयात हजर असलेले सर्व पोलिसांनी मिळून एका तासांनतर त्याला पिंप्राळारोड येथील एका इमारतीच्या गच्चीतून अटक केली.
सद्गुरूनगर येथील नितीन उर्फ रोहित शांताराम चौधरी यांची मोटारसायकल (एमएच 19 एक्यू 6318) ही भास्कर मार्केट परिसरातून चोरीस गेली होती. जिल्हापेठ पोलिसांनी या संदर्भात योगेशसह पाचोरा शहरातील बाहेरपुरा येथील शरद निंबा चौधरी याला अटक केली होती.
जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक रफिक काझी, सुरेश पाटील, संजय भांडारकर आणि सुभाष शिंपी यांनी बुधवारी दुपारी या दोघांना न्यायाधीश जयदीप पांडे यांच्या न्यायालयात हजर केले होते. दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयातून बाहेर पडताच योगेशने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढला. न्यायालयाच्या मागच्या गेटने बाहेर पडून तो पिंप्राळारोड परिसरातील कॉलन्यांमध्ये पळत सुटला. अ‍ॅड.एम.के.पाटील यांच्या घराच्या गच्चीवर तो लपून बसला होता. या घराच्या पुढे-मागे पोलिसांनी सुमारे 20 मिनिटे शोध घेतला. मात्र तो मिळून येत नव्हता. अखेर गर्दीतील नागरिकांनी पोलिसांना सुचविल्यानंतर पोलिसांनी गच्चीवर शोध घेतला असता तो कोपºयात आढळून आला. तेथून त्याला अटक केली. या गुन्ह्यात समाधान उर्फ बंटी नावाचा आणखी एक आरोपी आहे. अद्याप तो मिळून आलेला नाही. योगेश आणि शरद यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत तर चोरट्यांनी एक मोटारसायकलचे पार्ट वेगळे करून विक्री केली आहे.

एलसीबीनेही पकडले चोर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत येथून एका मोटारसायकलचोरास अटक केली. कृष्णा सुरेश खोंडे असे चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा चोपडा येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.