आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत - हुडकोत चड्डी-बनियान टोळी अवतरली; नागरिक भयभीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच िपंप्राळा हुडको परिसरात चड्डी-बनियान टोळीच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. १५ ते २० जणांचे हे टोळके रात्री-अपरात्री घरात घुसून चोऱ्या करतात, महिला-मुलींची छेड काढतात. या टोळक्यातील काही जणांनी एका मुलीसही पळवण्याचा प्रयत्न केला. वेळीच लक्षात आल्याने परिसरातील लोकांनी पाठलाग केला. त्यामुळे चोरट्यांनी मुलीस रस्त्यातच सोडून दिले.त्यांच्या दहशतीमुळे आता नागरिकांनी रात्रभर गस्त घालणे सुरू केले आहे. चार दिवसांपासून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांना पकडण्यात यश आलेले नाही.

शहरालगत असलेल्या हुडको भाग झोपडपट्टीचा असून या भागात मजूर वर्ग वास्तव्यास आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजता रामचंद्र आडांगे यांच्या घरातून त्यांचा मुलगा योगेश याची पॅण्ट घेऊन चोरट्यांनी पळ काढून त्यातील चार हजार रुपये पळवले. या दिवसापासून दर एक-दोन दिवसाआड चोरटे हुडकोच्या वेगवेगळ्या भागात चोऱ्या करत आहेत. हुडकोच्या तीन बाजंूना असलेले जंगल, शेतांचा आधार चोरटे लपून बसतात. लोक रात्रभर जागून गस्त घालत आहेत. मात्र, चोरटे त्यांच्या हाती लागले नाहीत.

परिसरातच मुक्कामी असल्याचा नागरिकांचा संशय
हुडकोच्या शेजारी असलेले जंगल अथवा शेतामध्ये चोरटे मुक्कामी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. १० ते १५ जाणांचे हे टोळके असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

पालिका, पोलिसांकडून मदतीची अपेक्षा
वारंवार घडत असलेल्या प्रकारामुळे नागरिकांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे चार दिवसांपासून दोन पोलिस रात्रीची गस्त घालत आहेत. तर परिसरातील सर्वच पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरटे धुमाकूळ घालत आहेत. महापालिकेने पथदिवे सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. काही लोकांनी एकत्र येऊन ३०-३० रुपये गोळा करून घराबाहेरील विजेच्या खांबावर स्वखर्चाने पथदिवे बसवून घेतले आहेत.

मुलीला पळवले
१३ रोजी रात्री ११.३० वाजता चाेरट्यांनी हुडकोच्या ख्वॉजािमया भागातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेले. ५०-६० लोकांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे वाघनगर येथील रेल्वे पुलाजवळ मुलीला सोडून देत त्यांनी पळ काढला. रविवारी सकाळी ८ वाजता शौचालयास गेलेल्या महिलांची छेड काढून पळ काढला.

- हुडकोमध्ये घडणाऱ्या प्रकाराबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्या ठिकाणी चार दिवसांपासून दोन पोलिस २४ तास गस्तीसाठी ठेवले आहेत. अशोक सोनवणे, पोलिस निरीक्षक

हे आहेत प्रत्यक्षदर्शी
अक्काबाई मोरे : शनिवारी रात्री १२ वाजता अक्काबाई यांच्या घरामागे एक चोरटा आला. त्याने शौचालयास गेलेल्या दोन मुलींना आवाज दिला. त्या मुलींसह अक्काबाईंनी चोराला पाहिले. मुली पळत-पळत घराकडे आल्या. त्यानंतर काही लोकांनी चोराला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आढळून आला नाही.

सीमा निकम : यांच्या घरात ३० रोजी चोरी झाली. चोरट्यांनी सुनील निकम यांच्या पॅण्टच्या खिशातील काही पैसे आणि मोबाइल चोरून नेला. घरातील कुणीही चोराला पाहिले नाही. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

जुलाल जाधव : १२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास जुलाल सोनवणे यांच्या घराच्या खिडकीवर दगडफेक झाली. काही वेळानंतर परिसरातील नागरिक लाठ्या-काठ्या घेऊन घराबाहेर आले. त्यांनी तीन जणांना शेताकडे पळताना पहिले.

विलास सुरवाडे : सिद्धार्थनगर भागात राहणारे विलास यांच्या घरात शनिवारी रात्री २ वाजता चोरटे घुसले. सुरवाडे, त्यांची पत्नी आणि मुलगा-मुलगी झोपलेले होते. चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सुरवाडे यांच्यासह पत्नीने चोरट्याला पाहिले. त्याने अंगावर काळा चिकट पदार्थ लावला होता. तर अंगात फक्त अंडरविअर घातलेली होती. त्याच्या हातात एलईडी लाइटाची बॅटरी व एका हातात स्प्रे होता. ओट्यावर त्याचे दोन साथीदारही होते.