आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुजाभाव : मंत्र्यांच्या महाविद्यालयात चोरी होताच पोलिस तत्पर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - जलसंपदा मंत्रीगिरीश महाजन चेअरमन असलेल्या येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर या महाविद्यालयातून चोरट्यांनी आठ संगणकांचे मॉनिटर, एका संगणकाची रॅम सहा संगणकांच्या पॉवर केबल असा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
पोलिसांसह एलसीबीच्या पथक पोलिस निरिक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, सर्वसामान्यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घरफोडीच्या तपासात दुर्लक्ष करणारे पोलिस मात्र येथे तत्परतेने धावून आल्याने दुजाभाव होत असल्याचे दिसून आले.

एकलव्य विद्यालयाच्या प्रांगणावर शनिवार रविवारी ऑल इंडिया शूटिंगबॉलच्या स्पर्धा सुरू होत्या. या वेळी शाळेच्या इमारतीतही प्रेक्षकांचा वावर होता. चोरट्यांनी हिच बाब हेरून संगणक खोलीचा चोरीच्या दृष्टीने निरीक्षण केले आणि स्पर्धा संपताच सोमवारी रात्री डाव साधला. स्पर्धा संपल्याने तेथील लावलेले साहित्य काढण्याचे काम सोमवारी रात्री एक वाजेपर्यंत सुरू होते. हिच संधी साधून चोरटे दुसऱ्या मजल्यावरील संगणक असलेल्या खोलीत शिरले.
दरवाजाची कडी तोडून आठ मॉनिटर, रॅम सहा संगणकांच्या पॉवर केबल असा ऐवज लंपास केला. रात्री असलेल्या वॉचमनच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. मंगळवारी महाशिवरात्रीची सुटी होती. मात्र, स्रेहसंमेलनासाठी सराव करण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी प्राचार्य किशोर आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहेत.
चोरट्यांनी कुलूप लावलेली कडी तोडून संगणक लंपास केले. संगणक ठेवलेल्या ठिकाणाचे ठसे घेताना पोलिस पथक.

बेजबाबदार वक्तव्य
गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोऱ्यांचे घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. नेरी औट पोस्टचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी झालेली चोरी ही नेरीच्या घटनेची पुनरावृत्ती असून आता आम्ही गांभीर्याने तपास करू, असे वक्तव्य केले. याचा अर्थ शहरात गेल्या दोन महिन्यांत २५ ते ३० चोऱ्यांबाबत पोलिस प्रशासन गंभीर नव्हते, हे स्पष्ट होते. दरम्यान, मंत्री महोदयांच्या शाळेत झालेली चोरी, ही आमचे नाक कापणारी घटना असल्याची खंत पोलिस निरीक्षक रफिक शेख यांनी व्यक्त केली.

नेरीतही संगणक चोरी
जामनेर शहरात गेल्या महिनाभरापासून चोरी घरफोडीचे १५ ते १६ घटना घडल्या. यात लाखो रूपयांचा ऐवज चोरीस गेला. नेरी येथील जनता विद्यालयातील प्रयोगशाळेतून पाच संगणकांची चोरी झाली. परंतु स्थनिक पोलिसांनी या बाबी विशेष गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळे जामनेर पोलिसात चोरीच्या दोनच तक्रारी दाखल झाल्यात. मात्र मंत्र्यांच्या शाळेत ४० ते ४५ हजारांची चोरी होताच स्थानिक पोलिसांसह स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घेतल्याने सर्वसामान्यांबाबत दुजाभाव होत असल्याचे बोलले जात आहे.

श्वानाने मंदिरापर्यंत चोरट्यांचा काढला माग

चोरीची घटना घडताच जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळताच त्यांनी श्वान पथकासह शिवदास नाईक, ठसेतज्ज्ञ पोलिस उपनिरीक्षक ए.बी.सय्यद, साहेबराव चौधरी, राजेंद्र महाजन तर स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष पाटील यांना घटनास्थळी पाठवले. श्वानाने शाळेपासून पाठीमागे असलेल्या एका मंदिरापर्यंत चोरट्यांचा माग काढला.